८१ उद्योग ‘रेड झोन’मध्ये
By Admin | Updated: January 28, 2015 23:37 IST2015-01-28T23:37:37+5:302015-01-28T23:37:37+5:30
जिल्ह्यात ७६४ उद्योग आहेत. यात १२ मोठे, दोन मध्यम तसेच ७४३ लघु उद्योगांचा समावेश आहे. प्रदूषण मानकानुसार जिल्ह्यातील ८१ उद्योग लाल संवर्गात (रेड झोन) मध्ये आहे.

८१ उद्योग ‘रेड झोन’मध्ये
प्रवीण पोटे : प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरूद्ध कठोर कारवाई
वर्धा : जिल्ह्यात ७६४ उद्योग आहेत. यात १२ मोठे, दोन मध्यम तसेच ७४३ लघु उद्योगांचा समावेश आहे. प्रदूषण मानकानुसार जिल्ह्यातील ८१ उद्योग लाल संवर्गात (रेड झोन) मध्ये आहे. या उद्योगांमध्ये स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया आहे काय, तसेच पाण्याचा वापर याबाबत अहवाल तयार करताना उद्योगाचे प्रदूषित पाणी नाल्यात अथवा नदीत सोडण्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केल्या.
सोबतच त्यांनी टाकाऊ अमलाचे व्यवस्थापन तसेच विल्हेवाट अवैध कत्तलखाने दवाखान्यांमधून निर्माण होणारा बायोमॅट्रिक कचरा यापासून निर्माण होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात तत्काळ कारवाई करावी व संबंधित उद्योगांना सक्त ताकीदही त्यांनी यावेळी दिली.
शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात औद्योगिक विकास, प्रदूषण तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांचा आढावा ना. पोटे यांनी घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना तसेच खाजगी सचिव रवींद्र धूरजड उपस्थित होते. विविध उद्योगांमधून पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रदूषणाबाबत कठोर कारवाई करतानाच जल व वायू प्रदूषण होणार नाही यासाठी सर्व उद्योगांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील नद्या व नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यांचे नमुने घेऊन पाणी प्रदूषित होत असल्यास संबंधित उद्योगांविरूद्ध तत्काळ कारवाई करावी व याविषयीचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रत्येक उद्योगाचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. रोजगार निर्मिती होणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्याचे धोरण असल्यामुळे अद्यापपर्यंत भूखंड घेऊन उद्योग सुरू केला नाही, असे सर्व भूखंड तत्काळ परत घ्यावेत, अशी सूचना करताना औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. जिल्ह्यात उद्योजकांनी सुमारे १० हजार कोटीची गुंतवणूक केली असून ७ मेगा प्रकल्पासह सुक्ष्म व लघु उद्योजकांनाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे उद्योग राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी अधीक्षक अभियंता जनबंधू, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हेमा देशपांडे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक डेकाटे यांनी स्वागत करून विभागनिहाय आढावा सादर केला.(जिल्हा प्रतिनिधी)