१६ हजार शेतकऱ्यांना ६.७१ कोटींची मदत
By Admin | Updated: February 9, 2015 23:18 IST2015-02-09T23:18:38+5:302015-02-09T23:18:38+5:30
खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे.

१६ हजार शेतकऱ्यांना ६.७१ कोटींची मदत
अरुण फाळके - कारंजा(घा.)
खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. रकमेचे धनादेश संबंधित बँकांना पाठविण्यात आले आहे. मदतीची रक्कम ६७ टक्के असून, कारंजाचे तहसीलदार राजेंद्र बालपांडे व त्यांच्या चमुने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळावी याकरिता विशेष मोहीम राबविल्याची माहिती आहे.
अतिवृष्टी, नापिकी आणि अत्यल्प भाव यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी यावर्षी हवालदील झाला होता. शेतीला लावलेला खर्चही निघालेला नाही. कापसाला भाव नाही. अत्यल्प भावात कापसाची विक्री करावी लागली. सोयाबीनचे भावही अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या सर्वांवर मार्ग निघून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी विधानसभेवर आर्वी ते नागपूर अशी पदयात्रा आढली. विदारक परिस्थितीची जाणीव सरकारला करून दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे.
कारंजा तालुक्यात १२० गावे आहेत. यातील ११ हजार ६०३ अल्पभूधारक तर ४ हजार ४९८ बहुभूधारक दुष्काळाचे बळी ठरले होते. अल्पभूधारकांची ८ हजार ३०१ हेक्टर तर बहूभूधारकांची ४ हजार ४९८ हेक्टर शेतजमीन बाधित झाली होती. शासनाने मदतीचा हात पुढे करून अल्पभूधारकांना ४ कोटी ३१ लाख १८, हजार ७७० रू. तर बहुभूधारकांना २, कोटी ४० लाख ५६ हजार २३० रुपये अशी एकूण ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. कोरडवाहूला प्रतिहेक्टर ४ हजार ५०० रू., बागायतीला ९ हजार रुपये तर संत्रा उत्पादकाला १२ हजार रू. प्रतिहेक्टर मतदीचा दर होता. सर्व लाभधारकांची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित बँकाकडे पाठविली असून आता बँकांनी प्रत्येक लाभधारकांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी आहे. परंतु काही बँका यासाठी टाळाटाळ करीत आहे.