पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: July 22, 2015 02:49 IST2015-07-22T02:49:57+5:302015-07-22T02:49:57+5:30

तालुक्यातील पारडी, आजनडोह, जऊरवाडा, नरसींगपूर व कन्नमवारग्राम या पाच गावांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २५) होऊ घातली आहे.

65 candidates for five Gram Panchayats in the fray | पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात

पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात


कारंजा (घाडगे) : तालुक्यातील पारडी, आजनडोह, जऊरवाडा, नरसींगपूर व कन्नमवारग्राम या पाच गावांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २५) होऊ घातली आहे. पाच गाव मिळून ४३ सदस्य निवडून द्यायचे आहे. त्यापैकी १४ सदस्य अविरोध आले आहे. उर्वरीत २९ सदस्यांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. या ६५ मध्ये तरुणाचा भरणा अधिक आहे. ज्यांना आरक्षणामुळे उभे राहता आले नाही त्यांनी राजकीय सत्ता हातची जावू नये म्हणून आपल्या नातेवाईक महिलांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
आजनडोह येथील तीन, जऊरवाडा दोन, नरसींगपूर दोन व कन्नमवारग्राम येथील एक सदस्य अविरोध निवडून आल्याची माहिती देण्यात आली आहे. खैरवाडा, मेटहिरजी, माळेगाव (काळी), पालोरा, सिंदीविहिरी, काजळी, दानापूर, बेलगाव या आठ गावामध्ये पोट निवडणूक होऊ घातली आहे. काजळी, दानापूर आणि बेलगाव येथे प्रत्येकी एक जागा निवडून द्यायची होती. या तिन्ही जागा अविरोध निवडून आल्या आहेत. माळेगाव (काळी), पालोरा, सिंदीविहिरी येथे प्रत्येकी एक जागा ना.मा.प्र. प्रवर्गाकरिता निवडून द्यायची होती. येथे एकही योग्य उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही म्हणून जागा रिक्त आहेत. खैरवाडा व मेटहिरजी येथे प्रत्येकी एक जागा निवडून द्यायची आहेत. तेथे दोन-दोन अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक होणार आहे. मतमोजणी २७ जुलैला होवून निकाल त्वरित जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार गजेंद्र बालपांडे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायाब तहसीलदार गणेश बर्वे व व्ही.एन. कातोरे, श्रीवास्तव, ढाकणे काम पाहत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
सरपंच, उपसरपंच पदाकरिता मनसेला भाव
गावात त्रिशंकू परिस्थिती : नव्या सरपंचाकडे साऱ्यांच्या नजरा

लालसिंह ठाकूर  गिरड
येथील १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी झाली. यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे गावात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. यात मनसेकडे असलेल्या दोन जागा निर्णायक ठरणार आहे. यामुळे येथील ग्रामपंचायतीची किल्ली मनसेच्या हाती आली आहे.
शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपकडे तीन सदस्य तर माजी सरपंच शेख इस्त्राईल यांच्या गटाचे तीन सदस्य आहेत. राष्ट्रीय काँग्रेस व मनसेकडे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. यामध्ये बहुमत कोणाजवळ नसल्यामुळे आता सरपंच व उपसरपंच करण्यासाठी सत्ता-समिकरणे मांडणे व तडजोडीचे राजकारण गावात सुरू झाले आहे.
३० किंवा ३१ जुलैला ही निवडणूक होणार आहे. सरपंचपद इतरमागासवर्गीय महिलेकरिता राखीव आहे. माजी सरपंचाच्या गटासह सेना व भाजपकडून दावा करण्यात येत आहे. उपसरपंच पदासाठी मनसेकडून दावा करण्यात येत आहे. गत पंचवार्षिकमध्ये सेनेच्या गिरजा कापसे तर भाजपचे उपसरपंच नुतन गिरडे होते. चार वर्षांनंतर अविश्वास येऊन एक वर्षासाठी काँग्रेसच्या संध्या पर्बत व सेनेचे महेश गौर उपसरपंच झाले. या सर्व प्रकारात तीन वर्षे न्यायालयात गेल्याने गावाचा विकास झाला नाही. त्यामुळे जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न देता उमेदवार आणि त्याच्या पारदर्शकतेवर कौल दिला.
मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या आठ सदस्य तर सेनेचे सहा सदस्य व एक जागा भाजपाकडे होती. या निवडणुकीत काँग्रेसला सहा तर सेनेला एका जागेचे नुकसान झाले. या काँग्रेसकडून बंडखोरी करून माजी सरपंच गटाने दोन जागा बळकावल्या आहेत. भाजपाला दोन जागा मिळाल्या तर मनसेने येथे दोन जागा मिळवित खाते उघडले. आता सरपंच पदासाठी ईस्त्राईल यांच्या तीन, भाजप तीन व मनसे दोन मिळून सरपंच व उपसरपंच पदासाठी बैठक झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे सेनेच्या पाच, काँग्रेसच्या दोन व मनसेच्या दोन अशा समिकरणाची तयारी आहे. असे असले तरी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सत्तेची चाबी मात्र मनसेच्या हाती आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतच्या राजकारणात मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे मात्र नक्की आहे.

Web Title: 65 candidates for five Gram Panchayats in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.