५.५५ लाख व्यक्ती झाल्या पूर्णपणे व्हॅक्सिनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:30+5:30
जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याने ते पूर्णपणे व्हॅक्सिनेट झाले आहेत.

५.५५ लाख व्यक्ती झाल्या पूर्णपणे व्हॅक्सिनेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय वर्धा येथून केवळ ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडल्याने वर्धा जिल्हा प्रशासनाकडून एक हजारांहून अधिक व्यक्ती उपस्थित राहणाऱ्या कार्यक्रमांवर काही निर्बंध लादले आहेत. कोविडच्या डेल्टापेक्षा ओमायक्रॉन हा आपला प्रसार झपाट्याने वाढवत असल्याने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे. जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याने ते पूर्णपणे व्हॅक्सिनेट झाले आहेत. असे असले तरी कोविड संकट मोठे असल्याने त्यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे क्रमप्राप्तच आहे. परंतु, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी कोविड संदर्भातील नियमांकडे नागरिक पाठ करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
९३.५९ टक्के व्यक्तींनी घेतला लसीचा पहिला डोस
- जिल्ह्यातील ९ लाख ६५ हजार व्यक्तींना कोविड लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ३ हजार १४९ व्यक्तींनी लसीचा पहिला, तर ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूणच जिल्ह्यात ९३.५९ टक्के व्यक्ती अंशत: तर ५७.५६ व्यक्ती पूर्णपणे व्हॅक्सिनेट झाल्या आहेत.
लस घेण्यात वयोवृद्धच पुढे
- जिल्ह्यात १७ हजार ५४० हेल्थकेअर वर्कर, १४ हजार ७२२ फ्रंटलाईन वर्कर, १८ ते ४४ वयोगटांतील ५ लाख ७६ हजार ४६० व्यक्ती, ४५ ते ५९ वयोगटांतील २ लाख २ हजार ७७८ व्यक्ती, तर ६०पेक्षा जास्त वयोगटातील १ लाख ५३ हजार ५०० व्यक्तींना कोविड लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी लस घेण्यात वयोवृद्धच पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार ९५७ वयोवृद्धांनी लसीचा पहिला, तर १ लाख २५ हजार ३८१ वयोवृद्धांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.