५०० एकरातील पिके पुराच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:12+5:30
वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

५०० एकरातील पिके पुराच्या पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे ३० सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने तसेच पावसाच्या कोसळधाराने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरुन सुमारे ५०० एकरातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, नदीला मिळणाऱ्या नदी,नाल्यांचे पाणी वर्धा नदीपात्रात समावू शकले नसल्याने नदीकाठावर असलेले जमीन पाण्याखाली गेली आहे. रोहणा, सायखेडा, दिघी, वडगाव येथील शेतकऱ्यांनी शेतात कापूस, तुर, सोयाबीन ही पीके घेतली आहे. शेतकºयांनी मोठा खर्च करुन पिके घेतली आहे.
जमीनीत बऱ्यापैकी ओलावा असल्यामुळे बहुतेक शेतकºयांनी आपल्या पिकांना नुकताच रासायनिक खतांचा डोज दिला व कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधींची फवारणी केली होती.मात्र, आता पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. शासनाने पिकांचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पाचे दार दोन सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी देऊरवाडा येथील पुलावरून वाहत असल्याने लोअर वर्धा प्रकल्पाचे दारं जास्त वर घेणे आवश्यक होते. म्हणून वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या ३१ दरवाजे १३० से.मी. उघडल्याने वर्धा नदीत ३४६६ क्युसेक प्रति सकेंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- देवानंद कापडे, शाखा अभियंता निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (बहादुरपूर)
महामार्गावरील पुलाचे पाणी थेट शेतात
साहूर : आधीच विविध संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यावर आता नवीनच संकट ओढावले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूल शेतजमिनीच्या सात फूट उंच केल्याने पुलावरील पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात गेले असून पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. मात्र, कंत्राटदाराचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. साहूर नजीकच्या द्रुगवाडा येथील शेतकरी रामदास कोंढेकर यांचे राष्ट्रीय महामार्गालगत शेत आहे. महामार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल हा शेतजमिनीच्या पातळीपेक्षा सात फूट खोल असून शेकडो एकरातील नालीचे पाणी पुलाच्या खड्ड्यात साचत असल्याने शेताला मोठाले भगदाड पडले असून शेतातील पिके धोक्यात आली आहे. रस्ता काठचे पाणी शेतात पाझरुन दोन एक शेत जलमय झाले आहे. हेच पाणी विहिरीत पाझरुन कृषीपंपासह विहिरी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आमदार दादाराव केचे यांनी आर.आर. कन्स्ट्रक्शनच्या कंत्राटदाराला स्वत: शेतात आणून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापही कंत्राटदाराने कुठलीही दुरुस्ती केलेली नाही. कंत्राटदाराने पुलाचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने साहूर येथील शेतकरी इंदिराबाई, दादाराव तळहांडे, शेख वशिक अली यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
याप्रकाराबाबत आष्टी येथील तहसीलदारांनी संबंधित कंत्राटदाराला नाली व पुलाची दुरुस्ती करुन पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.
शेतकरी-रामदास कोंढेकार .द्रुगवाडा.