ब्लिचिंग पावडरकरिता ५० हजारच!
By Admin | Updated: January 3, 2016 02:33 IST2016-01-03T02:33:40+5:302016-01-03T02:33:40+5:30
तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती आहे. यापैकी ४३ कमी उत्पन्नाच्या ग्रामपंचायतींना पंचायत समितीकडून ५० टक्के अनुदानावर ब्लिचिंग पुरविल्या जाते.

ब्लिचिंग पावडरकरिता ५० हजारच!
ग्रामस्थांना अशुद्ध पाणी : सेलू पंचायत समितीचे अनुदान
प्रफुल्ल लुंगे सेलू
तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती आहे. यापैकी ४३ कमी उत्पन्नाच्या ग्रामपंचायतींना पंचायत समितीकडून ५० टक्के अनुदानावर ब्लिचिंग पुरविल्या जाते. यासाठी पं.स.च्या शेष फंडातून वर्षाकाठी केवळ ५० हजाराची तरतूद केली आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नाविषयी पंचायत समिती व शासनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामस्थांना दररोज दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला शुद्ध पाण्याकरिता वर्षाकाठी मोठ्या प्रमाणात ब्लिचिंग पावडरची गरज पडते. छोट्या ग्रामपंचायतींना २५ किलो वजनाची बॅग ५८० रुपये पूर्ण किंमत गृहित धरून अर्ध्या किमतीत ५० टक्के अनुदानावर दिल्या जाते. अधिक उत्पन्नाच्या ग्रामपंचायती पूर्ण रक्कम मोजून ब्लिचिंग पावडर खरेदी करतात. कमी उत्पन्नाच्या ग्रामपंचायतींना अनुदानावर मिळालेली ब्लिचिंग संपले की बाजारातून पूर्ण रक्कम मोजून खरेदी करावी लागते. बहुतेक ग्रामपंचायती पूर्ण रक्कम देऊन ब्लिचिंग पावडर खरेदीच करीत नसल्याचे वास्तव आहे. पाण्याच्या स्त्रोतात नियमित ब्लिचिंग पावडर टाकल्याचा रेकॉर्ड मात्र ठेवल्या जातो. काही उदासीन ग्रामपंचायती नियमित असा रेकॉर्डही ठेवत नसल्याचे समोर आले आहे. ग्रा.पं. पातळीवर जलसुरक्षक म्हणून एका व्यक्तीची नेमणूक आहे. त्याने पाण्याच्या स्रोताचे नमुने घेऊन तपासणीसाठी देणे गरजेचे असते. हे नमुने घेताना फक्त काळजी घेतली जाते. इतर वेळस मात्र कुणी त्याकडे पाहत नाही, अशी स्थिती आहे.
बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरच्या बॅग अस्ताव्यस्त पडून दिसतात.
वास्तविक या पावडरची खूप काळजी घ्यावी लागते. पाण्यात ब्लिचिंग टाकण्याची पद्धतही ठरवून दिली आहे. बकेटमध्ये ब्लिचिंग पावडर पातळ केले की वरूनच विहिरीत टाकल्या जाते. या सदोष पद्धतीमुळे पावडर मधील आवश्यक घटक पाण्यात नव्हे तर हवेत विरघळून केवळ निष्फळ पावडर पाण्यात टाकण्याचा प्रकार तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुरू आहे.
पंचायत समितीस्तरावरून आरोग्य विस्तार अधिकारी या कामावर नियमित देखरेख ठेवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामपंचायतीची स्थानिक यंत्रणा उत्साह दाखवीत नाही, असे चित्र दिसते.
काही ग्रामसेवक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात तर काही ग्रामसेवक एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याचे कारण पुढे करीत दुर्लक्ष करतात. काही ग्रामसेवक कित्येक दिवस ग्रामपंचायतीला जातच नसल्याचे दिसून आले आहे.
पंचायत समितीस्तरावर ब्लिचींग पावडरसाठी असलेली तरतूद नवीन बजेटमध्ये वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा ब्लिचींगविना पाणी पिल्याने अनेक गावात जीवघेण्या आजारात वाढ होण्याची भीती आरोग्यतज्ज्ञाकडून वर्तविल्या जात आहे.
विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
पाण्याच्या स्रोतात नियमित ब्लिचिंग टाकून शुद्धीकरण करताना पाण्याच्या विहिरीतील काडीकचरा, घाण, प्लास्टिक, झाडाचा पाला एवढेच नव्हे तर चप्पल, जोडे सुद्धा असतात ते काढून नियमित साफसफाईची गरज आहे. ब्लिचींगविना नियमित दूषित पाणी पिण्यात येत असल्याने विविध आजाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे शासकीय सर्वत्र संबंधित यंत्रणेने या गंभीर प्रकाराची काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्वच ग्रामपंचायतीकडे ब्लिचिंग पावडर आहे. नियमित पाण्यात टाकण्याच्या आम्ही सूचना करतो. पाण्याचे नमुने तपासणीला पाठवितो. नेहमी ग्रामपंचायतीला भेट देऊन जलसुरक्षक व ग्रामसेवकांना मार्गदर्शन करीत असतो.
- आर.एम. बुंदिले, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत समिती, सेलू