जिल्ह्यात 49 अधिकारी अन् 1 हजार 500 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:17+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. जयंती उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस ठाणे स्तरावर रूट मार्च काढण्यात आले आहे.

जिल्ह्यात 49 अधिकारी अन् 1 हजार 500 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना कमी झाल्याने निर्बंधही उठविण्यात आले आहे. आगामी सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करा. पण, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही, याचीही काळजी घ्या. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना या उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. जयंती उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस ठाणे स्तरावर रूट मार्च काढण्यात आले आहे. ध्वनीक्षेपकाबाबत नियमित डेसीबलचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांची उपस्थिती होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष राहणार आहे हे विशेष.
२५० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सुमारे २५० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
मुख्य मार्गांवर ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहरासह जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.
- इतकेच नव्हेतर खासगी कॅमेऱ्यांतूनही ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. प्रक्षोभक भाषणे, घोषणा तसेच सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
अन्य मार्गाने वाहतूक...
शहरातील मिरवणुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम वंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी झाँसी राणी चौक, गांधी चौक, बापूराव देशमुख चौक येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
शिस्तप्रीय म्हणून सर्वत्र गांधी जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे सर्व सण, उत्सव साजरे करताना शिस्तीचे पालन करावे. गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, समाजकंटकांवर करडी नजर असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.