४२६ गावांत तंटामुक्त समित्या अध्यक्षाविना

By Admin | Updated: August 6, 2014 23:58 IST2014-08-06T23:58:07+5:302014-08-06T23:58:07+5:30

गावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही

426 villages without quota free committee | ४२६ गावांत तंटामुक्त समित्या अध्यक्षाविना

४२६ गावांत तंटामुक्त समित्या अध्यक्षाविना

मोहिमेला बसली खीळ : गावस्तरावर अल्प सहभाग व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे योजना अडचणीची
प्रशांत हेलोंडे - वर्धा
गावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही वर्षे यशस्वीरित्या राबविण्यात आले; पण सध्या यशस्वी मोहिमेलाही घरघर लागली आहे़ जिल्ह्यातील ४२६ गावांत तंटामुक्त गाव समितीला अध्यक्ष नाही़ शिवाय समित्यांचा कार्यकाळही संपला़ अध्यक्षपदासाठी कुणी उत्सूक नसल्याने तंटामुक्त गावेही तंट्यांच्या वाटेवर असल्याचे दिसते़
गावातील तंटे पोलीस ठाण्यात जाऊ नये, महागाईच्या काळात ग्रामस्थांना न्यायालयीन खर्च करावा लागू नये या उद्देशाने सुरू झालेल्या तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यात समित्या गठित करण्यात आल्या़ याद्वारे तंटे गावातच मिटविले जाऊ लागले़ यामुळे अनेक गावे तंटामुक्त झाली व तत्सम गावांना पुरस्कृतही केले गेले़ या मोहिमेतील पुरस्काराच्या रकमेचा विनियोग कसा करावा, याचे नियमही शासनाने दिले होते; पण त्यानुसार गावातील विकास कामांवर रक्कम खर्च होत नसल्याने विकास कामे झालीच नाहीत़ कालांतराने ही मोहिमही थंडावली़ सध्या वर्धा जिल्ह्यातील ४२६ तंटामुक्त गाव समित्यांचा कार्यकाळ संपलेला आहे़ या समितीचे नवीन अध्यक्षपद घेण्यास कुणीही उत्सूक नाही़
गृहमंत्री आऱआऱ पाटील यांनी सुरू केलेल्या तंटामुक्त गाव मोहिमेला प्रारंभीच्या दोन-तीन वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला; पण कालांतराने गावांतील गटातटाचे राजकारण, गुन्हेगारीमध्ये झालेली वाढ, स्टेशनरी साहित्य व मानधनाचा अभाव या प्रमुख कारणांनी ती थंडावली़ २०१२ पर्यंत समितीच्या काही प्रमाणात सभा होत होत्या; पण मागील दोन वर्षांत सभा तर दूरच कागदोपत्री अहवाल तयार करणेही बंदच आहे़ आजपर्यंत वर्धा जिल्ह्यात ४२६ गावांतील समित्यांना हक्काचे अध्यक्ष मिळत नाही, ही गृहखात्यासाठी चिंतेची बाब आहे़ जिल्ह्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आर्वी तालुक्यात ८५ गावे, आष्टी तालुक्यात ३७ गावे, कारंजा ४७, देवळी ३९, सेलू ४५, वर्धा ६९, हिंगणघाट ७२ व समुद्रपूर तालुक्यातील ३२ अशा ४२६ गावांमध्ये कुणीही अध्यक्ष बनण्यास तयार नाहीत़
तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये तहसीलदार आणि ठाणेदार हे महत्त्वाचा दुवा होते; पण संबंधित अधिकाऱ्यांना तंटे मिटविण्यात रस नसल्याचे दिसते़ शिवाय महसूल व पोलीस विभागाचे अधिकार संपुष्टात येऊ नये, अशी भीतीही आहे़ यामुळेच शासनाचे अधिकारी ही मोहीम राबविण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करीत नसल्याचे दिसते़ यशस्वी झालेली ही मोहीम पुनर्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणेच गरजेचे झाले आहे़

Web Title: 426 villages without quota free committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.