४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:18+5:30
दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली.

४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या मळणीच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी मळणी करून सोयाबीनची थेट विक्रीही केली आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितींच्या यार्ड मध्ये शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी एकूण ४ लाख २५ हजार ६५९ क्विंटल सोयाबीनची खेरदी केल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली. परंतु, परतीच्या पावसाचा चांगलाच फटका अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. शेतात कापून ढिग करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान ओले झाले. तर काही शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारात जाऊ नये म्हणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली. यंदा ३० ऑक्टोबरपर्यंत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार ३६८.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी रेल्वेत ५९ हजार २६० क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे ३ लाख १६ हजार १११ क्विंटल, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ हजार २७ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव येथे १ हजार २७१.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी येथे १२ हजार ९८४.७८ क्विंटल तर कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे ६३६.८० क्विंटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी भरघोस भाव वाढीची प्रतीक्षा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत शेतकरी सोयाबीन विक्रीकरिता आणत आहेत.
आद्रतेमुळे समाधानकारक भाव नाहीच
परतीच्या पावसामुळे अनेक शेतशिवारात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण असल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन वाळलेले नाही. जे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी सध्या येत आहे त्यात आद्रता जास्त असल्याने व्यापारीही त्यावर बोट ठेवत पाहिजे तसा भाव देत नसल्याची ओरड सध्या सोयाबीन उत्पादकांकडून होत आहे.
लेखी तक्रार केल्यास मिळणार नुकसान भरपाई
परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची जुळवाजुळव सध्या शासकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान भिजले त्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीबाबत लेखी स्वरूपात अर्ज आणि झालेल्या नुकसानीबाबतचे छायाचित्र तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्यास नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केल्याचे वास्तव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात झालेल्या नुकसानीची माहिती तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यावी.
- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.
सोयाबीन उत्पादकांनी त्यांचा शेतमाल बाजारपेठेत विक्रीकरिता आणताना वाळवून आणावा. जेणेकरून त्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडूनही चांगला भाव मिळेल.
- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.