४०० हेक्टर पिकांचे होणार सिंचन

By Admin | Updated: July 22, 2015 02:41 IST2015-07-22T02:39:23+5:302015-07-22T02:41:59+5:30

राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. यात नाला खोलीकरण, सरळीकरण व अन्य उपाययोजना केल्या जात आहे.

400 hectares of crop will irrigate | ४०० हेक्टर पिकांचे होणार सिंचन

४०० हेक्टर पिकांचे होणार सिंचन

आष्टी (श.) : राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. यात नाला खोलीकरण, सरळीकरण व अन्य उपाययोजना केल्या जात आहे. तालुक्यातही हे अभियान राबविले जात असून लहानआर्वी येथे नाला खोलीकरणामुळे तब्बल ४०० हेक्टर पिकांचे सिंचन होणार आहे.
लहानआर्वी येथील नाला शेताच्या मधोमध होता. यामुळे पावसाळ्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. गत २०-२५ वर्षांपासून सदर नाला गाळाने बुजला होता. यामुळेही पावसाचे पाणी शेतातून वाहून जात होते व पिके खरडली जात होती. या नाल्याचे खोलीकरण झाल्यास पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन लहानआर्वीचे सरपंच सुनील साबळे यांनी तशी मागणी कृषी विभागाकडे केली. यावरून कृषी विभाग व बजाज फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे काम हाती घेण्यात आले. परिसरातील सर्व नाल्यांचे पाणी एकत्र करून मुख्य नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. सर्वत्र वाहून जाणारे पाणी या नाल्यात गोळा झाल्याने तब्बल ४०० हेक्टरवर पिकांचे सिंचन शक्य झाले आहे. सर्व नाल्यांचे पाणी मुख्य नाल्यात साठविले जाणार असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. लहानआर्वी येथील शेतकरी, सरपंच आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतजमीन सिंचनाखाली आल्याने समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
शेतपिकांचे नुकसान टळणार !
लहानआर्वी येथील मुख्य नाला पूर्वी शेताच्या मधोमध होता. शिवाय गत २० ते २५ वर्षांपासून सफाई न झाल्याने नाला गाळाने बुजला होता. यामुळे पावसाळ्यात पिकांचे अतोनात नुकसान होत होते. नाल्यातील पाणी शेतातून वाहून जात असल्याने पिके खरडून निघत होती. या नाल्याला मिळणाऱ्या अन्य नाल्यांतील पाणीही शेतांतून वाहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानास सामोरे जावे लागत होते.
लहानआर्वी येथील सरपंच साबळे यांनी पुढाकार घेत कृषी विभागाकडे नाला खोलीकरण व सरळीकरणाची मागणी लावून धरली. यावरून कृषी विभागानेही सदर नाल्याच्या खोलीकरणाचे काम हाती घेतल्याने तब्बल ४०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणे शक्य झाले आहे. नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे शेतांतून वाहून जाणारे पाणी थांबणार असून पिकांचे नुकसानही टाळता येणार आहे.

Web Title: 400 hectares of crop will irrigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.