सिंदी बाजार समितीकरिता ३९ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: July 19, 2015 02:17 IST2015-07-19T02:17:56+5:302015-07-19T02:17:56+5:30
सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत १८ पैकी दोन जागा अविरोध ठरल्या आहेत.

सिंदी बाजार समितीकरिता ३९ उमेदवार रिंगणात
दोन जागा अविरोध : ९१ जणांनी दाखल केले होते नामांकन
सेलू : सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत १८ पैकी दोन जागा अविरोध ठरल्या आहेत. उर्वरित १६ जागेसाठी निवडणूक होत आहे. याकरिता एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
निवडणुकीसाठी १०१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अर्जाच्या छाननीच्या वेळी दहा उमेदवाराचे अर्ज रद्द झाले. उर्वरीत ९१ उमेदवारापैकी गुरुवारी ५० उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. यात अडते व्यापारी गटातील दोन जागेसाठी दोनच अर्ज राहिल्याने सहकार गटाचे संजय तडस व बबन हिंगणेकर हे अविरोध निवडून आले.
उर्वरीत १६ जागेसाठी ही निवडणूक होत आहे. याकरिता ३९ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण सात जागेसाठी १६, महिला प्रवर्गातून दोन जागेकरिता चार, इतर मासवर्गीय एका जागेसाठी दोन, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण दोन जागेसाठी सात, अनु-जाती जमाती एका जागेकरिता दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहे. हमाल मापारी गटात एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीत सत्तारुढ सहकार गटाला शह देण्यासाठी भाजपाने आपले उमेदवार निवडणूक रणांगणात उतरविल्याने ही सरळ लढत होणार आहे. सेवा सहकारी संस्था गटातील सर्वसाधारण सात जागेसाठी १६ उमेदवार आहे. तर ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण वर्गात दोन जागेसाठी सात उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन गटात होणारी सरळ लढतीमुळे मतविभाजन होणार असल्याने चुरस वाढली आहे. हमाल व्यापारी गटात एका जागेसाठी चार उमेदवार असल्याने येथे चौरंगी लढतीचे संकेत आहेत. नेत्यांचे मनोमिलन झाल्यानंतर दोन गट आमने सामने आल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापत आहे. या निवडणूक काळात दोनही गटाला मतदार कितपत साथ देतात यावरच निकाल अवलबंून असला आहे. (तालुका प्रतिनिधी)