34.61 कोटींच्या थकबाकीमुळे महावितरणच्या अडचणीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST2021-08-11T05:00:00+5:302021-08-11T05:00:18+5:30
थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकीदाराने आपल्याकडील थकबाकीची रक्कम तातडीने अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

34.61 कोटींच्या थकबाकीमुळे महावितरणच्या अडचणीत भर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड संकटामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी विद्युत देयक नियमित अदा केले नाही. परिणामी, जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २१ हजार ५६१ ग्राहकांकडे ३७.९८ कोटींची रक्कम थकली. थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकीदाराने आपल्याकडील थकबाकीची रक्कम तातडीने अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अन् होऊ शकतो विद्युत पुरवठा खंडित
- लॉकडाऊन काळात थकलेल्या विद्युत देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणकडून सध्या विशेष थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे.
- सुरुवातीला ग्राहकांना विद्युत देयक भरण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत; पण वारंवार सूचना देऊनही थकीत विद्युत देयक न भरणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचा थेट विद्युत पुरवठाच खंडित केला जात आहे.
पोलिसांची घेतली जातेय मदत
थकबाकी वसुली मोहीम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे असा अनुचित प्रकार टाळता यावा आणि थकबाकी वसुली मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविता यावी या हेतूने महावितरण सध्या पोलिसांची मदत घेत आहे. एकूणच अतिसंवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तात सध्या थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे.
सस्य:स्थितीत ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकलेली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरण थकबाकी वसुली मोहीम राबवीत असून, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीची रक्कम अदा करून महावितरणला सहकार्य करावे.
- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.