३०० विद्यार्थी ४५० प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 9, 2014 23:41 IST2014-07-09T23:41:27+5:302014-07-09T23:41:27+5:30
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अशी चार प्रकारची जवळ-जवळ ३०० विद्यार्थ्यांची

३०० विद्यार्थी ४५० प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत
आंजी (मोठी) : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अशी चार प्रकारची जवळ-जवळ ३०० विद्यार्थ्यांची ४५० प्रमाणपत्रे जानेवारी २०१४ मध्ये स्थानिक आदर्श विद्यालय व गर्ल्स हायस्कूल येथे शिबिर घेऊन काढण्यात आले होती. सहा महिने लोटूनही अद्याप कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने, विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश रखडले आहे. परिणामी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या विद्याथ्यांवर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सावंगी-वर्धा स्थित मास्टर कॉलनी येथील महा ई सेवा केंद्र (महाआॅनलाईन) चे संचालक राजेंद्र कांबळे यांनी आदर्श विद्यालय तसेच गर्ल्स हायस्कूल आंजीच्या मुख्याध्यापकांना सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत ८ वी, ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे जात तसेच इतर प्रमाणपत्र काढण्याकरिता आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे पत्र दाखवून आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढावयाचे असतील त्यांच्यासाठी शिबिर घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार जानेवारी २०१४ मध्ये सदर शाळांमध्ये शिबिर घेऊन आदर्श विद्यालय येथे जवळपास ३०० प्रमाणपत्रे तर गर्ल्स हायस्कूल येथे ६६ विद्यार्थिनींची १५७ प्रमाणपत्रे काढण्यात आली. यापैकी केवळ तीन विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून इतर विद्यार्थी अजूनही प्रमाणपत्रांपासून वंचित आहे.
सदर प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रती प्रमाणपत्र कही रक्कम अदा करावी लागली. यामध्ये जात प्रमाणपत्र ८० रुपये, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ८० रुपये, उत्पन्नाचे प्रमाणपत्र ६० रुपये, अधिवास प्रमाणपत्र ६० रुपये अशी आकारणी असताना प्रत्यक्षात मात्र ई महा सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र कांबळे याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जवळपास ७०० ते ८०० रुपये वसूल केलेत. २८० रुपयांमध्ये प्रमाणपत्र द्यायचे तिथे ७०० ते ८०० रुपये प्रमाणपात्रासाठी द्यावे लागले.
ज्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले त्यावर महा ई सेवा केंद्राचे संकेतस्थळ उपलब्ध आहे. परंतु या साईटवर उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र उपलब्धच नाही.
संचालक राजेंद्र कांबळे, सुगत टेंभरे व राहूल काळबांडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता या तिघांचेही भ्रमणध्वनी बंद दाखवीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्यें संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शाळांमध्ये विचारणा केली असता या सीएससी केंद्राचा भ्रमणध्वनी क्रमांकाव्यतिरिक्त कुठलाही पुरावा शाळेकडे उपलब्ध नाही. तसेच या बाबतीत शिक्षण विभागाचे किंवा महसूल विभागाचे शिबिर घेण्याबाबतचे कुठलेही पत्र शाळेकडे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या संचालकाने या शाळेंव्यतिरिक्त अशा अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र काढण्याच्या नावावर लुबाडणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश देण्यास टाळाटाळ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)