२८६ गावांना पाणीटंचाईची झळ
By Admin | Updated: February 1, 2016 01:59 IST2016-02-01T01:59:50+5:302016-02-01T01:59:50+5:30
उन्हाळा आला की जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते. जानेवारी अखेरच जिल्ह्यात यंदा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे.

२८६ गावांना पाणीटंचाईची झळ
उन्हाळ्याची चाहूल : जिल्ह्यात ४७८ उपाययोजनांवर ८ कोटी रुपयांचा खर्च
रूपेश खैरी वर्धा
उन्हाळा आला की जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते. जानेवारी अखेरच जिल्ह्यात यंदा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे. शिवाय यंदाच्या अल्प पावसामुळे विहिरींची पातळीही वाढण्यास विशेष मदत झाली नाही. यामुळे जिल्ह्यात या उन्हाळ्यात २८६ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.
या गावात नागरिकांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागणार असल्याने शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. टंचाईसदृश्य गावांत एकूण ४७८ योजना राबविण्यात येणार आहे. यावर जिल्हा परिषदेच्यावतीने ७ कोटी ९८ लाख ४५ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांकडून या अपेक्षित खर्चाला हिरवी झेंडी मिळाली आहे. यामुळे पाणीटंचाईचे सावट असलेल्या या गावात उपाययोजना राबविण्याच्या कामांना प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात पाण्याची पातळी टिकविण्याकरिता मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्यातून बऱ्याच गावात बंधारे बांधत पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असतानाही जिल्ह्यातील निम्म्या गावात पाणीटंचाई असल्याचे जिल्हा परिषदेच्या आराखड्यातून दिसते आहे. यावर करण्यात येत असलेला खर्च प्रत्येक उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या आराखड्यापेक्षा अधिक असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या निधीतून नागरिकांकरिता कायमस्वरूपी योजना आखण्याचा प्रयत्न असल्याचेही विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी दर वर्षाला उन्हाळा येताच पाणीटंचाई डोके वर काढत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. हे चित्र बदलविण्याची मागणी आहे.
पाण्याकरिता चामलावासीयांना दोन किमीचा फेरा
आष्टी (शहीद) : तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या चामला गावात गत २५ वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. हे गाव रेड झोनमध्ये आले आहे. पाण्याची गरज भागविण्याकरिता गावकऱ्यांना २ किमीचा फेरा सहन करावा लागत आहे.
या गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. या पाणीटंचाईमुळे त्यांच्या व्यवसायावर चांगलाच प्रभाव झाला आहे. ४०० लोकसंख्या असलेल्या या गावात मोजक्याच विहिरी आहेत. त्यांची पातळीही खालावली आहे. ही स्थिती प्रत्येक वर्षाची असताना शासनाकडून येथे अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. येथे नागरिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.
या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पाणी पुरवठ्याचे काम मंजूर झाल्याची माहिती आहे; मात्र त्याचेही भिजत धोंगडे दिसते आहे. शासनाने अशा गावांना विशेष बाब म्हणून प्राधान्य देणे आवश्यक आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कारंजा येथे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र या कार्यालयात उपविभागीय अभियंता सतत गैरहजर असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
यावर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी तुळशीराम बिटणे, सुरचंद धुर्वे, वसंता बिटणे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. सद्या मंगेश घाटोळे यांच्या विहिरीवरून बैलबंडीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी सकाळपासून कसरत करावी लागत आहे.