२१७ गावांत जलसंधारण
By Admin | Updated: January 27, 2015 23:36 IST2015-01-27T23:36:45+5:302015-01-27T23:36:45+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान

२१७ गावांत जलसंधारण
जलयुक्त शिवार अभियान : टंचाईवर कायम मात करण्याचे उद्दिष्ट
वर्धा : पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील २१७ गावांत राबविले जात आहे़ पालोती येथील नाला खोलीकरण या प्रत्यक्ष कामाने हा उपक्रम सुरू झाला़ यात ४४ लाख रुपयांत जलस्त्रोतांचे बळकटीकरण केले जाणार आहे़
सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला. यावेळी आ़ पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, जि़प़ सदस्य मीरा वाळके, विरेंद्र रणनवरे, सरपंच ज्योत्स्ना वर्धने, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जि़प़ उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे सांगताना खा़ तडस यांनी शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होऊन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
आ़ भोयर यांनी जिल्हा पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी गावातील पाण्याचे नियोजन करून गरजेनुसार पाण्याचा वापर केल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पालोती येथे ८६५ टीसीएम पाण्याची मागणी असताना केवळ ३५० टीसीएम पाणी उपलब्ध आहे. नाला खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे़ यामुळे शेतकऱ्यांनीही आपला सहभाग द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देता यावे, यासाठी जलयुक्त शिवार हा कार्यक्रम प्रत्येक गावात राबविण्याची गरज जिल्हाधिकारी सोना यांनी व्यक्त केली़ मार्च २०१६ अखरेपर्यंत २१७ गावांत हा उपक्रम राबवायचा आहे़ ५३ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम केवळ शासनाचा नसून जनतेनेही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी वाळके, उपसरपंच रवी राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी स्वागत करून जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)