20 police for population security over one lakh | लाखावर लोकसंख्या सुरक्षेसाठी २० पोलीस

लाखावर लोकसंख्या सुरक्षेसाठी २० पोलीस

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील वास्तव : गुन्हेगारीचा आलेख वाढताच

अरुण फाळके।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : लाखावर लोकसंख्या असलेल्या या तालुक्याकरिता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ३५ जणांचा अपुरा फौजफाटा आहे. यातील प्रत्यक्ष २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जनतेची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पुरेसा पोलीस कर्मचारी द्यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, याप्रमाणे अधिकारी सोडून केवळ ३५ पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी न्यायालयीन कामासाठी ३, दारू प्रकरणे, अपघातांच्या घटनांमधील, अहवाल नागपूरवरून आणणे आणि नोटीस तामील करणे, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था करणे या कामासाठी दररोज १५ पोलीस कर्मचारी लागतात, म्हणजेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ २० पोलीस कर्मचारी. त्यातील काही व्यक्तीगत सुटीवर जातात. महिला पोलिसांची प्रसूती रजा टाळताच येत नाही. या सर्व बाबींचा विचार केल्यास कारंजा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी पडत आहे. हा कर्मचारीवर्ग कारंजा तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी संख्या, व अधिकारी संख्या वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे तालुकावासींनी केली आहे.

बांगडापूर, सारवाडीत हवी चौकी
बांगडापूर किंवा कन्नमवारग्रामसह सारवाडी या अतिदुर्गम व जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, ही सर्व गावे कारंजा पोलीस ठाण्यापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर आहेत.

या परिसरातून जाणाऱ्या वर्धा रस्त्यावर अनेक अपघात घडतात. लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. घनदाट जंगल असल्यामुळे अवैध व्यवसायाला वाव आहे. त्यावरसुद्धा नियंत्रण ठेवता येईल.

१०२ गावे, ४९ ग्रामपंचायती
तालुक्यात १०२ गावे ४९ ग्रामपंचायती, एक नगरपंचायत असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. तालुक्यातील दोन टोकाच्या गावांमधील अंतर ८० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.

तालुक्याच्या मध्यभागातून महामार्ग क्रमांक ६ जात असून जंगलव्याप्त परिसर असल्यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाणही लक्षणीय आहे. तुलनात्मक दृष्ट्या आर्वी, आष्टी तालुक्यापेक्षा या तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक आहे.

Web Title: 20 police for population security over one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.