२ हजार ६०० रुग्णांनी घेतला जीवनदायी योजनेचा लाभ
By Admin | Updated: December 13, 2014 22:43 IST2014-12-13T22:43:45+5:302014-12-13T22:43:45+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात आली. महाराष्ट्रातील उर्वरीत २७ जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली.

२ हजार ६०० रुग्णांनी घेतला जीवनदायी योजनेचा लाभ
वर्धा : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात आली. महाराष्ट्रातील उर्वरीत २७ जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ हजार ६०० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना या योजनेचा लाभ देताना शासनाचे ६ कोटी ५० लक्ष रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिली.
योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, गंभीर आजार आणि त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गरजू रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या योजनेला जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालेले असून, ही योजना शासन पुढील एक वर्षासाठी नुतनीकरण करून राबवित असून योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील पिवळे किंवा केशरी राशन कार्ड धारकांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण चालू राहणार आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबावर पहिल्या वर्षी कितीही औषधोपचारावर खर्च झाला असला तरीही नव्याने नुतनीकरणानंतर दीड लाखांचे विमा संरक्षण सुरू राहणार आहे. योजनेत ९७१ आजार व १२१ पाठपुरावा आजार समाविष्ट आहेत. योजनेत लाभार्थी कुटुबांतील रुग्णास रुग्णालयाचा खर्च, औषधोपचार खर्च, संपूर्ण तपासणीचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, रुग्णास दोन वेळेचे जेवण व परतीचा प्रवासाचा खर्च पुरविला जातो. हा खर्च विमा कंपनीमार्फत रुग्णालयास देय केला जातो. राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ४८० मान्यता प्राप्त रुग्णालय आहेत. जिल्ह्यात मान्यता प्राप्त रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, राणे हॉस्पिटल आर्वी यांचा समावेश आहे. लाभार्थी कुटुंब योजनेचा लाभ राज्यातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात घेवू शकतो. योजनेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पीयूष सिंग यांनी १० डिसेंबर २०१४ रोजी वर्धेत रुग्णालयांना भेट देत कार्याची प्रशंसा केली.(प्रतिनिधी)