वृक्षारोपणाने दिला १६ हजार मनुष्य दिवस रोजगार
By Admin | Updated: July 28, 2014 23:41 IST2014-07-28T23:41:00+5:302014-07-28T23:41:00+5:30
पर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़

वृक्षारोपणाने दिला १६ हजार मनुष्य दिवस रोजगार
हजारो वृक्ष जिवंत : सात ते आठ फुटांपर्यंत वाढलीत झाडे
किरण उपाध्ये - पुलगाव
पर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़ देवळी तालुक्यात मात्र सामाजिक वनीकरण विभागाने गत दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या वृक्षारोपणाने सरासरी १६ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून दिला़ वनिकरणने १२ हजार वृक्षांचे रोपण केले आहे़
सामाजिक वनीकरण विभागात काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे़ सेवानिवृत्त वा बदली झालेल्या रिक्त पदावर नवीन कर्मचारी नियुक्त झाले नाहीत़ इत:पर मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वनिकरण विभाग सामाजिक बांधिलकीचे काम पार पाडत आहे़ देवळी तालुक्यातील १५ शाळांतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध उपक्रमांचे प्रशिक्षण, प्रगतीचा लेखाजोखा ठेवणे, वृक्षदिंडी, नाल्यांवर बंधारे बांधणे, स्वच्छता अभियान, रंगपंचमी होळीला पर्यावरणपूरक व रसायनविरहित रंग वापरणे, सर्पमैत्री, सहल, प्रदूषणविरहित फटाके फोडणे, चित्रकला, वादविवाद, निबंध स्पर्धांचे आयोजन, शेतकऱ्यांना साग, बांबू, वृक्ष लागवडीबद्दल सातत्याने प्रबोधन करणे आदी कामे करीत आहे़ त्यातच शतकोटी उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालय, नझुल, महसूल, संस्था, शाळांच्या पडित जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांच्या अखत्यारितील जागेवर वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले होते; पण अद्याप ३३ टक्के भूप्रदेश वनाच्छादीत झाल्याचे दिसत नाही़
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाचे वर्धा जिल्हा उपसंचालक बडगे यांच्या मार्गदर्शनात दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व संगोपण करून ग्रामीण लोकांना रोजगार दिला आहे़ यात २०१२ मध्ये रत्नापूर-अडेगाव या ४ मिकी अंतरावर २ हजार, २०१३ मध्ये विजयगोपाल-इंझाळा, भिडी-बाभुळगाव मार्गावर ३ हजार झाडे, दिघी-देवळी-वायगाव रोडवर १ हजार झाडे, २०१४ मध्ये कोळोणा (घो़) - विजयगोपाल, रोहिणी-शिरपूर-वाटखेडा ते अडेगाव मार्गाच्या दुतर्फा विविध प्रजातींची ६ हजार रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे़
शिवाय या वर्षी मनरेगा अंतर्गत गुंजखेडा येथे १५ हजार रोपांची रोपवाटिका सुरू करण्यात आली आहे़ या रोपवाटिकेवर अंदाजे १ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ यातून आतापर्यंत १६ हजार मनुष्य दिवस रोजगार दिला आहे़ ही सर्व झाडे जिवंत असून ५ ते ७ फुट उंचीची झाली आहेत़