‘फाग’ उत्सवाला १२६ वर्षांची परंपरा

By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:16+5:302016-03-20T02:14:16+5:30

वसंत ऋतूची पानगळ सुरू झाली असून गर्द लाल केशरी फुलांनी पळस, रानावनात विविध वृक्ष विविध रंगाच्या फुलांनी बहरलेले दिसतात. आमराईही मोहरली आहे.

The 126-year tradition of 'fag' festival | ‘फाग’ उत्सवाला १२६ वर्षांची परंपरा

‘फाग’ उत्सवाला १२६ वर्षांची परंपरा

सामाजिक संघटनांचाही पुढाकार : उत्तर भारतीयांच्या फाल्गुन उत्सवास प्रारंभ
प्रभाकर शहाकार पुलगाव
वसंत ऋतूची पानगळ सुरू झाली असून गर्द लाल केशरी फुलांनी पळस, रानावनात विविध वृक्ष विविध रंगाच्या फुलांनी बहरलेले दिसतात. आमराईही मोहरली आहे. अशातच होलिका दहन व रंगपंचमीचा सण येतो. वास्तविक, होलिका दहन म्हणजे वाईट गुणांचे दहन करणे होय. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी या दिवशी वडीलधाऱ्या मंडळींना गुलाल लावून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे; पण आज होळी व रंगपंचमी या सणाला विकृत स्वरूप आले असले तरी शहरात १२६ वर्षांपासून उत्तर भारतीय समाज बांधव रंगपंचमीच्या दिवशी ढोल, झांज घेऊन ‘फाग’ म्हणत शहरातील समाज बांधक व स्रेहीजणांना गुलाल उधळत शुभेच्छा देतात. ही परंपरा आजही पाळली जात आहे.
हा फाग उत्सव एक महिना चालत असून त्याचा प्रारंभ साधारणत: महाशिवरात्रीला होतो. काही दशकापूर्वी शहरातील पंडित शिवरामप्रसाद तिवारी, पंढरीनाथ केशरवानी, गयाप्रसाद तिवारी, अनंतप्रसाद शुक्ला, भरोसेसिंह ठाकूर, बचई महाराज, अवस्थी गुरुजी, श्यामसुंदरसिंह ठाकूर, बद्रीसिंह ठाकूर आदी मंडळींनी शहरात फाग उत्सवाला चांगले स्वरुप दिले. या माध्यमातून त्यांनी शहरवासियांना सामाजिक बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली असली तरी त्यांचा वारसा आजही रामेश्वरप्रसाद तिवारी, विश्व हिंदू परिषदेचे सोहनलाल, तिवारी परिवारातील अ‍ॅड. अनिल तिवारी, अ‍ॅड. अजय तिवारी, साहू परिवारातील गेंदालाल साहू, मनीष साहू, ठाकूर परिवारातील संदीप ठाकूर, नंदनसिंह ठाकूर, मिश्रा, शर्मा, परिवार चालवित आहे.
या पर्वात दररोज सायंकाळी समाज बांधवांकडे एकत्र येऊन ढोल, झांज, हार्मोनियम या संगीत वाद्यासह एकसंघ आवाजात परमेश्वराचे नामस्मरण करून फाग गातात. कार्यक्रमात अल्पोपहार, चहा घेऊन ज्येष्ठ मंडळींना गुलाल लावून शुभेच्छा दिल्या जातात. रंगपंचमीच्या दिवशी धार्मिक महत्त्व देत शहरातील प्रमुख मार्गाने फाग गात गुलाल उधळीत होळीच्या शुभेच्छा देतात. पुलगाव शहरात १२६ वर्षांपासून जपली जात असलेली ही परंपरा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. विशेषत: धूलिवंदनाच्या दिवशी शहरातील सर्वच नागरिकांना शुभेच्छा देत फाग गात फिरणारी मंडळी लक्ष वेधक ठरते. ही परंपरा पुढेहीे जपली जाईल, असा मानस ही मंडळी व्यक्त करतात.

लोककला जपण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य
शिवरात्रीपासून सुरू होणारा आणि साधारण एक महिनाभर चालणारा फाग हा उत्सव शहरात उत्साहात साजरा केला जातो. ही लोककला जपण्याकरिता आता सामाजिक संघटना आणि नागरिकही पुढाकार घेताना दिसतात. या फाल्गुन महोत्सवाचे स्थानिक स्तरावर प्रसारणही केले जाते. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, होळीसाठी वृक्षकटाई होऊ नये, रसायनयुक्त रंगांचा वापर करण्यात येऊ नये, सामाजिक सद्भाव कायम राखला जावा यासाठी काही सामाजिक संघटनाही पुढाकार घेत असल्याचे दिसते. यामुळे एकूणच शहरात सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होत असल्याचे दिसून येते.

Web Title: The 126-year tradition of 'fag' festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.