कानगावात ११ लाखांचा देशी दारूचा साठा जप्त
By Admin | Updated: August 12, 2014 00:04 IST2014-08-12T00:04:45+5:302014-08-12T00:04:45+5:30
पोळ्याचा सण जवळ येत असल्याने वर्धेत मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत कानगाव येथे मोठ्या

कानगावात ११ लाखांचा देशी दारूचा साठा जप्त
वर्धा : पोळ्याचा सण जवळ येत असल्याने वर्धेत मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत कानगाव येथे मोठ्या प्रमाणात दारूसाठा आल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी धाड घातली. या कारवाई करीत अकरा लाख रुपयांच्या देशी दारूच्या ३५७ पेट्या व एक जीप असा एकूण १७ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानगाव येथील ज्ञानेश्वर डंभारे व त्याचा मुलगा याने त्याच्या शेतातील गोठ्यामध्ये पोळा सणानिमित्त विक्रीकरिता मोठ्या प्रमाणात दारूची साठवणूक करून ठेवली असून सदर दारूसाठा जनार्दन रोकडे रा. उमरी, यवतमाळ व विलास पुरके रा. सोनुर्ली, जि. यवतमाळ यांच्या मदतीने हलविणार होते. अशा माहितीच्या आधारावर ज्ञानेश्वर डंभारे याच्या कानगाव येथील मोझरी (शेकापूर) मार्गावरील शेतात पोलिसांनी अचानक धाड घातली. या शेतातील गोठ्यासमोर एक पांढऱ्या रंगाची मालवाहू गाडी उभी असून त्यात काही इसम देशी दारूच्या खर्ड्याच्या पेट्या ठेवताना आढळले.
यावेळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी मालवाहू गाडीतून देशी दारूच्या दहा पेट्या जप्त केल्या, यावेळी गोठ्याची झडती घेतली असता देशी दारूच्या ३११ पेट्या व १२ हजार १३६ शिशा एका पोत्यात सापडल्या. पोलिसांनी या दारूसाठ्यासह एमएच-४० टी.सी. डी-१०९ क्रमांकाची मालवाहू गाडी, एमएच ३२ ई ७६७३ क्रमांकाची दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण १७ लाख ७८ हजाार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ज्ञानेश्वर डंभारे (५८) व बाप्या ऊर्फ प्रशांत डंभारे दोन्ही रा. कानगाव, जनार्दन रोकडे (२६) वर्षे, रा. उमरी ता. कळंब, जि. यवतमाळ, विलास पुरके (२४) वर्षे, रा. सोनूर्ली, जि. यवतमाळ या तिघांविरूद्ध अल्लीपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सहायक फौजदार उदयसिंग बारवाल, जमादार अशोक वाट, दिवाकर परिमल, सुभाष आदे, आनंद भस्मे, अमर लाखे, समीर कडवे यांनी केली.(प्रतिनिधी)