१ हजार ३६१ गावे टंचाईग्रस्त
By Admin | Updated: March 19, 2015 01:39 IST2015-03-19T01:39:52+5:302015-03-19T01:39:52+5:30
सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत.

१ हजार ३६१ गावे टंचाईग्रस्त
वर्धा : सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत. या गावांमध्ये शासनाच्यावतीने टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. गावात दुष्काळ जाहीर झाल्याने या गावातील खातेदारांना शासनाच्यावतीने विविध सवलती जाहीर करण्यात येतात. सदर सवलती दुष्काळग्रस्तांना देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गावांत कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
सर्वाधिक गावे आर्वी तालुक्यातील
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांत सर्वाधिक २२२ गावे आर्वी तालुक्यातील आहेत. यात वर्धा तालुक्यातील १५५, सेलू तालुक्यातील १७०, देवळी तालुक्यातील १५०, हिंगणघाट १८८, समुद्रपूर २१९, आष्टी (शहीद) १३६ आणि कारंजा तालुक्यातील १२१ अशा एकूण १ हजार ३६१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जाहीर करण्यात आले आहे़
गावांना मिळणाऱ्या सुविधा
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पाणी पुरविण्यासाठी टॅँकर्सचा वापर, टंचाई जाहीर गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.