मोदींकडून 'विकसित उत्तराखंड'साठी रोडमॅप, ₹८,२६० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण-शिलान्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 19:30 IST2025-11-09T19:30:03+5:302025-11-09T19:30:27+5:30
एफआरआय परिसरात आयोजित या भव्य समारंभात पंतप्रधान मोदींनी गढवाली आणि कुमाऊंनी भाषेत बोलून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी राज्य आंदोलनातील शहीद आणि आंदोलनकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मोदींकडून 'विकसित उत्तराखंड'साठी रोडमॅप, ₹८,२६० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण-शिलान्यास
उत्तराखंड राज्याच्या रौप्य महोत्सवी (२५ व्या) स्थापना दिनाच्या मुख्य समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देहरादून येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी ₹८,२६० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास केले. उत्तराखंडने गेल्या २५ वर्षांत केलेल्या प्रगतीची प्रशंसा करतानाच, त्यांनी पुढील २५ वर्षांसाठी, म्हणजेच '२०४७ मधील विकसित भारत' साठी 'विकसित उत्तराखंड'चा रोडमॅप सादर केला आणि विलंब न करता या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले.
एफआरआय परिसरात आयोजित या भव्य समारंभात पंतप्रधान मोदींनी गढवाली आणि कुमाऊंनी भाषेत बोलून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी राज्य आंदोलनातील शहीद आणि आंदोलनकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांनी सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी सरकारने ज्या अपेक्षांसह राज्याची निर्मिती केली, त्या आज पूर्ण होत आहेत. २५ वर्षांपूर्वी ₹४,००० कोटी असलेले राज्याचे बजेट आज ₹१ लाख कोटी पेक्षा जास्त झाले आहे. वीज उत्पादन चारपट वाढले, तर रस्त्यांची लांबी दुप्पट झाली आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे, दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वे, केदारनाथ-हेमकुंड साहिब रोपवे असे ₹२ लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. राज्यात केवळ १ असलेले मेडिकल कॉलेजचा आकडा आज १० वर गेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजची संख्याही १० पेक्षा जास्त वाढली आहे.
२०४७ साठी रोडमॅप आणि भविष्यवेध:
पंतप्रधानांनी 'जिथे इच्छाशक्ती, तिथे मार्ग' हे सूत्र अवलंबून राज्याला पुढील वाटचाल करण्याचा सल्ला दिला. उत्तराखंडला जगाची अध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याची क्षमता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात योग केंद्र विकसित करणे आणि 'व्हायब्रंट व्हिलेज'ला छोटे पर्यटन केंद्र बनवणे. 'वन डिस्ट्रिक्ट - वन फेस्टिव्हल'द्वारे राज्याला जागतिक नकाशावर आणण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
आदि कैलाशमध्ये पर्यटक संख्या ३०,००० पर्यंत वाढली आहे. ईको आणि ॲडव्हेंचर टूरिझमवर भर देण्याची गरज आहे. राज्यातील १५ कृषी उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे. स्थानिक उत्पादनांना 'हाऊस ऑफ हिमालयाज' ब्रँडद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. उत्तराखंड 'वेड इन इंडिया' मोहिमेचा लाभ घेत वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री धामींकडून 'विकसित उत्तराखंड'चा संकल्प
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधानांचे स्वागत करताना, राज्याची वाटचाल "विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड" या मंत्रावर सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागू केलेल्या समान नागरिक संहिता, नकल विरोधी कायदा, धर्मांतरण विरोधी कायदा आणि दंगल विरोधी कायद्यांचे कौतुक केले. या निर्णयांनी उत्तराखंड समरस समाजाच्या निर्मितीकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री धामी यांनी नमूद केले की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून साकारलेले उत्तराखंड, २०२४७ पर्यंत एक समृद्ध आणि आत्मनिर्भर प्रदेश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडने ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट, G-20 परिषदेच्या बैठका आणि ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे भव्य आयोजन करून जगासमोर बदलत्या उत्तराखंडचे सुवर्ण चित्र ठेवले आहे.
तसेच केदारनाथ दुर्घटना, सिलक्यारा बोगदा अपघात किंवा जोशीमठ भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळी पंतप्रधानांनी संवेदनशीलतेने उत्तराखंडच्या जनतेला साथ दिली. त्यांच्या सहकार्यानेच राज्य संकटातून सावरून नव्या शक्तीने पुढे जात आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंग, केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा, विधानसभा अध्यक्ष रितू खंडुरी, राज्यसभा खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.