बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी
By योगेश पांडे | Updated: February 19, 2025 23:11 IST2025-02-19T23:10:38+5:302025-02-19T23:11:22+5:30
असंख्य भाविकांना त्रिवेणी संगमाशी जोडणारा दुवा, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी नियमित कामांना मारली दांडी

बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, प्रयागराज: येथे सुरू असलेल्या महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनदेखील दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी देशभरातून येत आहेत. यंदाचा महाकुंभ आस्था व श्रद्धा यांचे दर्शन दाखविणारा ठरला असला तरी स्थानिकांनी निरनिराळ्या माध्यमांतून यातून अर्थकारणदेखील साधले आहे. विशेषत: प्रचंड वाहतूककोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्याने कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक मोटारसायकलस्वार तरुण हेच सारथी झाले आहेत. अनेकांनी महिन्याभरात यातून लाखो रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे पवित्र संगमावर जाण्यासाठी नाव चालविणाऱ्या नावाड्यांनादेखील अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ने प्रयागराजमधील एकूण वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली असता बहुतांश भाविक हे सरासरी १५ ते २० किलोमीटर पायीच चालत असल्याचे दिसून आले. महाशिवरात्रीच्या अगोदर काहीही करून पवित्र स्नान व्हावे यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर पवित्र संगम व विविध आखाड्यांवर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्थाच नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी मोठी अडचण होत आहे. मात्र त्यांच्यासाठी स्थानिक मोटारसायकलस्वार तरुण सारथी झाले आहेत. एकीकडे भाविकांची सेवा व दुसरीकडे अर्थलाभ असे दुहेरी गणित या तरुणांकडून साधले जात आहे. सर्वसाधारणत: पार्किंग तसेच रेल्वेस्थानकापासून कुंभाच्या प्रवेशद्वारापर्यंत किंवा प्रवेशद्वारापासून विविध घाटांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये हे मोटारसायकलस्वार दिसून येत आहेत. एका व्यक्तीकडून चारशे ते हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे. यातून दिवसभरात सहजपणे एक मोटारसायकलस्वार तीन ते चार हजार रुपये कमावत असल्याचे वास्तव आहे.
भाविकांची सोय, पोलिसांचे अभय
या बाइक टॅक्सीला शासनाची कुठलीही मान्यता नाही. मात्र भाविकांची सोय होत असल्याने आमच्याकडून फारशी कारवाई होत नसल्याचे सहायक पोलिस आयुक्त एस. एस. परिहार यांनी सांगितले. बहुतांश मोटारसायकलस्वार एकाच वेळी दोन भाविकांना बाइकवर नेत आहेत. मात्र एकूण स्थिती पाहता पोलिसांकडूनदेखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळण्यात येत आहे.
नौकेचे सारथ्य करण्यासाठी हजारो नावाडी
दरम्यान, विविध घाटांपासून पवित्र संगमापर्यंत आत जाण्यासाठी भाविकांकडून नाव व मोटारबोट्सचा वापर करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत प्रयागराजमध्ये सुमारे पाच हजार बोट संचालित होत आहेत. त्या चालविण्यासाठी प्रयागराजसोबत उत्तर प्रदेश व बिहारमधूनदेखील अनेक नावाडी आल्याची माहिती स्थानिक बोटचालक धर्मेंद्र प्रेमचंद याने दिली.
बोटिंगचे दर दहापट वाढले, गंगेतही ट्रॅफिक जॅम
महाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी ४५ रुपये ते १२५ रुपये इतके दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र कोट्यवधी भाविकांची गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदारांकडून तब्बल दहा पटींहून अधिक दर आकारण्यात येत आहेत. ‘लोकमत’ने याची शहानिशा केली व एका व्यक्तीकडून १३०० ते १६०० रुपये घेण्यात येत असल्याची बाब समोर आली. यातील ३० टक्के रक्कम कंत्राटदाराला जात असून उर्वरित रक्कम नावाडी वाटून घेत आहेत. एका बोटीत एका वेळेला जवळपास १० भाविक बसत असून या तुलनेत दिवसाला दोन ‘ट्रीप’देखील त्यांना मोठा फायदा करवून देत असल्याची माहिती स्थानिक कंत्राटदार धर्मेंद्र प्रेमचंदने दिली.