योगी सरकार यूपीमध्ये १५ लाख झाडे लावणार; प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकार्यांची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:57 IST2025-09-12T16:55:46+5:302025-09-12T16:57:06+5:30
सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला यूपीच्या ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे.

योगी सरकार यूपीमध्ये १५ लाख झाडे लावणार; प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकार्यांची नेमणूक
लखनौ - येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात उत्तर प्रदेशात सेवा पर्व साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरात १.२५ कोटी झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये योगी सरकार उत्तर प्रदेशात १५ लाख झाडे लावणार आहे. सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला राज्यातील ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे. याशिवाय पर्यावरण संरक्षण जागरूकता अभियान, पावसाळी पाण्याचा योग्य वापर आणि इतर अनेक मोहिमाही राबवल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात प्रभागीय वन अधिकारी यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
जन सहभागाने सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये आयोजन
याबाबत वन पर्यावरण खात्याचे प्रमुख सचिव अनिल कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशसाठी १५ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यूपीच्या सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये जनसहभागाच्या माध्यमातून झाडे लावण्याचे आयोजन केले जावे असे निर्देश विभागातील अधिकाऱ्यांसह सर्व प्रभागीय वन अधिकाऱ्यांना दिले आहेत. झाडांच्या प्रजातींची निवड पूर्ण करावी, सर्व वृक्षारोपण स्थळांचे फोटो आणि एमआयएस डेटा Meri Life पोर्टलवर अपलोड करावे. जिल्हा वृक्षारोपण समिती इतर विभागांशी समन्वय साधून झाडांचे संरक्षण आणि देखभाल सुनिश्चित करेल असं त्यांनी सांगितले.
३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक
दरम्यान, सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला यूपीच्या ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे. याशिवाय, वन विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये, वन निगमाच्या सर्व डेपोमध्ये स्वच्छता आणि प्राणी उद्यान तसेच सफारीमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी मोहीम राबवली जाईल. विविध पक्षी अभयारण्यांमध्ये स्वच्छता मोहीम, पर्यावरण संरक्षण जागरूकता, पावसाच्या पाण्यासह जलस्रोतांच्या संरक्षणासाठी जागरूकता मोहिमाही राबवल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात नर्सरी ॲक्शन प्लॅनवर कार्यशाळा होईल. जिल्हास्तरावर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत यासंदर्भात प्रबुद्ध वर्ग संवादात वन-वन्यजीव संरक्षण, हरीतिमा संवर्धन, जैवविविधता यासारख्या विषयांवर डीएफओ सहभागी होतील. जिल्हास्तरीय मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये वन विभागाचाही सहभाग असेल. आयोजनासाठी तयारी सुरू आहे असं वृक्षारोपण महाभियान-२०२५ चे मिशन संचालक दीपक कुमार यांनी सांगितले.
यूपीला मिळाले १५ लाख झाडांचे लक्ष्य
सेवा पर्व अंतर्गत देशभरात १.२५ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये उत्तर प्रदेशला १५ लाख झाडांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
सर्वाधिक लक्ष्य असलेली १० राज्ये
ओडिशा: २० लाख
उत्तर प्रदेश: १५ लाख
आसाम: ११.५० लाख
गुजरात: ११ लाख
छत्तीसगड: ११ लाख
मध्य प्रदेश: ८ लाख
महाराष्ट्र: ७ लाख
आंध्र प्रदेश: ७ लाख
राजस्थान: ७ लाख
बिहार: ५ लाख