उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीमुळे वृद्ध दामत्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर, त्यांची १४ वर्षांची नात थोडक्यात बचावली. ही घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) पहाटे घडल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भगवती प्रसाद (वय, ९५) आणि त्यांची पत्नी उर्मिला देवी (वय, ८५) अशी मृतांची नावे आहेत. भगवती प्रसाद यांचा मुलगा प्रमोदने दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजता त्याने आपली ई-स्कूटर तळमजल्यावर चार्जिंगला लावली. त्यानंतर बॅटरीचा स्फोट झाला आणि स्कूटरला आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण घरात पसरली. धुरामुळे भगवती प्रसाद यांच्या नातीला जाग आली आणि तिने मदतीसाठी पहिल्या मजल्यावर असलेल्या आपल्या पालकांना हाक मारली. आग लागल्याची माहिती मिळताच शेजारीही मदतीसाठी धावले.
एसीपी मयंक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने कुटुंबातील इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. पण तोपर्यंत आग वेगाने पसरली. या आगीत भगवती प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी उर्मिला देवी यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले, मात्र दीड तासानंतर त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. स्कूटर अजूनही वॉरंटीमध्ये होती, असा दावा प्रमोद यांनी केला आहे. या घटनेसाठी संबंधित कंपनी जबाबदार आहे, असाही त्यांनी आरोप केला आहे. या घटनेमुळे चार्जिंगवर लावलेल्या ई-स्कूटरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.