उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) एक धक्कादायक अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग ९१ (आग्रा-अलिगड रोड) वरील नानाऊ पुलाजवळ कार आणि मिनीबसच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, परंतु पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजता अक्राबाद पोलिस स्टेशनच्या परिसरात हा भीषण अपघात झाला. टक्कर इतकी जोरदार होती की इंधन टाकी फुटली आणि त्यातून आग लागली. आग तात्काळ पसरण्यामुळे वाहनात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढता आले नाही. स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, परंतु आगीच्या तीव्रतेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करणे शक्य झाले नाही.
कारमधील कुटुंब मंदिराच्या दर्शनासाठी जात होते. या कुटुंबात दोन मुले, एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश होता. भाजल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले असून, प्राथमिक माहितीप्रमाणे हे सर्व कुटुंबाचे सदस्य होते. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.
ग्रामीण एसपी अमृत जैन यांनी सांगितले की, "गोपी पुलावर दोन वाहनांची टक्कर झाल्याची माहिती मिळाली. या धडकेनंतर दोन्ही वाहने पेटली आणि त्यात अडकलेल्या जणांचा होरपळून मृत्यू झाला. एक जण जखमी झाल्याची माहिती आहे." पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक वळवली.