'भारताच्या स्वातंत्र्याला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रत्येक भारतीयाच्या मनात संविधान, राष्ट्रीय प्रतिकं, राष्ट्रीयत्व, क्रांतिकारक आणि महापुरुषांबद्दल सन्मानाची आदराची भावना आणखी वृद्धिंगत होत आहे', असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन केले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये तिरंगा यात्रेची सुरूवात झाली. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिरंगा यात्रा कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घरापर्यंत पोहचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर प्रत्येक घरावर तिरंगा आपल्याला दिसत आहे. तिरंगा यात्रा फक्त यात्रा नाहीये, तर भारत माता, महापुरुष, क्रांतिकारक आणि वीर सैनिकांच्या कार्याला केलेला सलाम आहे. त्यांच्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता आहे."
भारताचे शौर्य, धाडस देशाने बघितले -योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचे शौर्य, पराक्रम, धाडस आणि ताकद जगाने पाहिली. भारताचे शौर्य बघून जग थक्क आहे. त्यामुळे भारताचा सन्मान ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे उत्तरदायित्व आहे."
"140 कोटी भारतीयांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रमातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपापल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात सहभागी व्हावे. ऐक्याला तडा देऊ पाहणाऱ्या, समाज, भाषा, प्रांत आणि जाती या मुद्द्यावरून लोकांमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या कंटकांचा पर्दाफाश करा", असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.
यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या तरुण-तरुणी आणि इतरांना मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही त्यांच्यासोबत उत्साहात फोटो काढले. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी तिरंगा यात्रेला झेंडा दाखवला.