नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 18:07 IST2023-09-24T18:06:50+5:302023-09-24T18:07:15+5:30
धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे.

नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू
पुराणकाळातील नाग-नागिणीच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू, आजच्या काळात हादरवणारी घटना घडली आहे. नाग नागिणीच्या जोड्याने दोन सख्ख्या भावांना डसले आहे. या मुलांवर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच तीन दिवसांनी त्यांच्या पित्यालाही डसले आहे. भयकंप उडविणारी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे.
लालगंज कोतवाच्या धाधुआ गजान गावातील ही घटना आहे. गावात राहणारा बबलू यादव दुसऱ्या शहरात कामाला जातो. पत्नी आणि दोन मुले, 9 वर्षांचा आगम यादव आणि 7 वर्षांचा अर्णव गावातील घरात राहत होते. 17 सप्टेंबरच्या रात्री कोब्रा सापाच्या जोडीने बबलूच्या घरात घुसून खाटेवर झोपलेल्या दोन मुलांना सर्पदंश केला.
यामुळे मुलांनी ओरडायला सुरुवात केली, बबलूची पत्नी जागी झाली आणि तिने लाईट लावली तर दोन साप तिथून निसटताना दिसले. घरच्यांनी आधी गावठी उपचार केले, परंतू फरक पडत नसल्याचे पाहून हॉस्पिटल गाठले. तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. इकडे बबलूला खबर देण्यात आली, त्याने मुलांना पाहताच शुद्ध हरपली.
यानंतर तीन दिवसांनी बबलू बाहेर जात होता, तेवढ्यात या सापांच्या जोडीने त्याच्यावर हल्ला केला. त्याला डसायचा प्रयत्न केला, परंतू बबलू वाचला. परंतू सापाला पाहून तो पुन्हा बेशुद्ध पडला. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.