चमत्कार! पायानं दिव्यांग असलेला रुग्ण सरकारी रुग्णालयात गेला अन् चक्क चालू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:27 IST2023-08-28T19:26:58+5:302023-08-28T19:27:19+5:30
निराश झालेल्या मनोजने महोबा येथील आरोग्य केंद्र गाठून दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्याचं ठरवले

चमत्कार! पायानं दिव्यांग असलेला रुग्ण सरकारी रुग्णालयात गेला अन् चक्क चालू लागला
बांदा – उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका दिव्यांग व्यक्तीला नवं जीवदान मिळाले आहे. हा व्यक्ती पायाने दिव्यांग होता, तो हॉस्पिटलमध्ये दिव्यांग सर्टिफिकेट बनवायला पोहचला होता. परंतु डॉक्टरांनी त्याला सर्टिफिकेट देण्याऐवजी त्याला येणाऱ्या समस्येवर तोडगा काढला. ऑपरेशन करून डॉक्टरांनी या व्यक्तीचे दोन्ही पाय ठीक केले. आता हा व्यक्ती त्याच्या पायावर चालू-फिरू शकतो. डॉक्टरचा सल्ला पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
महोबा जिल्ह्यात राहणारा मनोज राजधानी दिल्लीत राहून मजुरी करायचा. त्यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. अचानक तो एकेदिवशी आजारी पडला. इतका हतबल झाला की त्याला चालता-फिरता येणेही शक्य नव्हते. त्याच्या पायाला काही झाले त्याला कळाले नाही. अनेक ठिकाणी उपचार केले परंतु काहीच उपाय कामी आला नाही. त्यानंतर निराश झालेल्या मनोजने महोबा येथील आरोग्य केंद्र गाठून दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्याचं ठरवले. मात्र डॉक्टरांनी त्याला बांदा येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतरच सर्टिफिकेट बनवले जाईल असं डॉक्टर म्हणाले.
पुढे मनोजने सांगितले की, मी बांदा येथील मेडिकल कॉलेजमधून पोहचून डॉक्टर अरविंद जे न्यूरो सर्जन आहेत त्यांना भेटलो. तर त्यांनी तु ठीक होशील, फक्त इथे भरती हो, तुझे ऑपरेशन करावं लागेल असा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनोज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाला, त्यानंतर त्याचे ऑपरेशन करण्यात आले. आता मनोज पूर्णपणे बरा झाला आहे. मनोजनं यापूर्वी झाशी, कानपूर अशा विविध शहरात उपचार केले परंतु आराम मिळाला नाही. परंतु बांदा येथे डॉक्टरांनी मनोजला पुन्हा पायावर उभे केले. तो आता पूर्वीसारखा चालू फिरू शकतो.
डॉक्टरनं सांगितले काय झाले होते?
न्यूरो सर्जन अरविंद कुमार म्हणाले की, महोबा येथून एक युवक आमच्याकडे आला होता. ज्याला दोन्ही पायाने चालता येत नव्हते. त्यांच्या गुडघ्यातील हड्डीत एस्पाइनल कार्ड ट्यूमर झाला होता. पायात अनेक गाठी तयार झाल्या होत्या त्यामुळे त्याला त्रास होत होता. त्याला त्याच्या पायावरही उभे राहता येत नव्हते. याठिकाणी त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर ऑपरेशनचा सल्ला दिला. त्यासाठी मनोजही तयार झाला. आता ऑपरेशन यशस्वी झाले असून मनोजला पूर्वीसारखे चालता फिरता येत आहे. पुढील २ आठवड्यात तो पूर्णपणे बरा होईल. सरकारी शुल्काशिवाय त्याच्याकडून काहीही पैसे घेतले नाहीत. त्यामुळे मनोजला नवीन जीवदान मिळाले.