प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविक दाखल झाले आहेत. येथे श्रद्धेची वेगवेगळी रुप बघायला मिळत आहेत. अगदी स्प्लेंडर बाबापासून ते आयआयटीयन बाबापर्यंत पर्यंत, अनेक जण चर्चेत आहेत. यातच आता सोमोर आले आहेत 'काँटे वाले बाबा'. त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यांचे नाव रमेश कुमार मांझी असे आहे. त्यांच्या साधना करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे ते सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.
हे बाबा काट्यांवरच साधना करतात, यामुळेच त्यांना 'कांटे वाले बाबा', म्हटले जाते. ते गेल्या ५० वर्षांपासून दरवर्षी अशी साधना करत आहेत. तसेच आपल्याला या काट्यांपासून कसलही इजा होत नाही, असेही सांगतात. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, "मी गुरुंची सेवा करतो. गुरुंनी आम्हाला ज्ञान दिले, आशीर्वाद दिले. हा सर्व देवाचा चमत्कार आहे. मी गेल्या ४०-५० वर्षांपासून दरवर्षी अशा पद्धतीने साधना करतो."
बाबांनी म्हटले आहे की, "आपण उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि गंगासागरलाही भेट देतात. मला फायदा होतो म्हणून मी हे करतो. यामुळे मला कधीही त्रास होत नाही." पुढे ते म्हणाले, "मी दिवसाला हजार रुपये कमवतो. मिळणाऱ्या दक्षिणेतील अर्धी रक्कम मी जन्माष्टमीला देईल आणि उरलेली माझ्या खर्चासाठी वापरेन.”
दरम्यान, 10 देशांच्या 21 सदस्यांचे प्रतिनिधिमंडळ बुधवारी सायंकाळी प्रयागराजमधील अरेल टेंट सिटीमध्ये पोहोचले. यांत फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) चे प्रतिनिधी आहेत. यांनी आज संगमावर स्नान केले. दौऱ्यादरम्यान हे प्रतिनिधिमंडळ प्रयागराजची समृद्ध सांस्कृती आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी हेरिटेज वॉकमध्येही भाग घेईल. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल.