१५ जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण करा; नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत काम बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 05:17 IST2023-12-30T05:15:59+5:302023-12-30T05:17:59+5:30
मंदिर उभारणीची जबाबदारी असलेल्या संस्थेला १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१५ जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण करा; नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत काम बंद
त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे बांधकाम प्रमुख नितेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
मंदिर उभारणीची जबाबदारी असलेल्या संस्थेला १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिश्रा यांनी रामजन्मभूमी परिसरातील प्रवासी सुविधा केंद्र, जटायू मंदिर आणि परकोटाच्या बांधकामाच्या प्रगतीचीही माहिती घेतली. १५ जानेवारीनंतर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा होत नाही तोपर्यंत परिसरात कोणतेही बांधकाम केले जाणार नाहीत व काम बंदच राहणार आहे.
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, गर्भगृहाचे काम पूर्ण झाले आहे, आता पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. पहिल्या मजल्याचे शटरिंगचे कामही या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या मूर्तीची निवडही आजच्या बैठकीत पूर्ण होणार आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मूर्ती नेमक्या कुणी तयार केल्या?
गर्भगृहात बसविण्यासाठी ३ पैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे. या मूर्ती बनवून तयार आहेत. कर्नाटकातील दोन आणि राजस्थानमधील एक अशा मूर्ती आहेत. कर्नाटकातील मूर्ती काळ्या रंगातील आहेत तर राजस्थानची मूर्ती पांढरी संगमरवरी आहेत. कर्नाटकचे शिल्पकार डॉ. गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि जयपूरचे सत्यनारायण पांडे यांनी या मूर्ती तयार केल्या आहेत. डॉ. गणेश भट्ट यांनी १ हजारपेक्षा अधिक मूर्ती तयार केल्या आहेत. अरुण योगीराज हे ही मूर्ती तयार करण्यात प्रसिद्ध असून, त्यांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले आहे.
राम मंदिर परिसरात दारू विक्रीवर बंदी
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी अयोध्येच्या पंचकोशी परिक्रमा मार्गावर मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पंचकोशी परिक्रमा मार्गावरील दारूची दुकाने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना
दिले आहेत.