लखनौ - उत्तर प्रदेशच्या बालिया येथे एका सार्वजनिक शौचालयाची भींत पडल्याने अपघात होऊन दोन मुलींचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. मृत दोन्ही मुली अल्पवयीन असून सख्या बहिणी होत्या. याप्रकरणी, पोलिसांनी प्राथमिक तपास करुन माहिती दिली. सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत असताना अचाकन भीतं त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने या दोन्ही बालिकांचा जीव गमावला. विशेष म्हणजे हे सार्वजनिक शौचालय, या मुलींचे आजोबा गावचे सरपंच असतानाच बांधण्यात आले होते.
अधिक माहिती देत पोलीस निरीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी अंशू आणि तनू या दोन्ही सख्ख्या बहिणी गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत होत्या. त्याचवेळी, या शौचालयाची भींत कोसळल्याने, भींतींच्या ढिगाऱ्याखाली त्या दबल्या गेल्या. त्यानंतर, नातेवाईकांनी तत्काळ त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, २००२ साली जेव्हा गावातील हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. त्यावेळी, मृत लहान मुलींचे आजोबा राजनाथ यादव हेच गावचे प्रमुख म्हणजेच सरपंच होते. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.