'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 07:45 PM2021-06-24T19:45:39+5:302021-06-24T20:29:54+5:30

 उस्मानाबाद येथे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला.

'Keep the Shivsena away'; Activists' tone in NCP's Pariwar Sanwad | 'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर

'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार

उस्मानाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारी उस्मानाबादेत झालेल्या परिवार संवादात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दूर ठेऊन स्वबळावर लढण्याचा सूर आळवला. तसेच ते गटातटावरही बरसले. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत संयमी शब्दात समजूत काढत मार्ग काढण्याचा शब्द दिला.

उस्मानाबाद येथे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संवादाची सुरुवातच पदाधिकार्यांच्या अडचणी समजून घेण्यापासून करण्यात आली. एका पदाधिकार्याने शिवसेनेशी जुळवून घेणे कठीण असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर दुसर्यानेही तोच सूर आळवला. उलट शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार केली. आतापर्यंत शिवसेनेलाच विरोध केला. आता त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असा सवालही त्या पदाधिकार्याने केला. काही पदाधिकार्यांनी अधिकारी आपले कोणतीच कामे ऐकत नाहीत, अशी तक्रार केली. खासदार, आमदारांच्या शिफारशी आणायला सांगतात, असे सांगताच जयंत पाटील यांनी कोणती कामे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सावरुन त्या पदाधिकार्याने सर्वसामान्यांच्या काही कामांची उदाहरणे दिली. पाटील यांनी कोण कामे ऐकत नाहीत, त्यांची नावे द्या, आपण स्वत: त्यांना बोलू, असे सांगून समाधान केले.

आम्हाला काही किंमत आहे का...
कोणत्याही पक्षातील गटतट, भांडणे ही राजकारणात सजीवपणाची लक्षणे समजली जातात. तोच प्रकार येथे पहायला मिळाला. अनेक पदाधिकार्यांनी गटातटावर तळमळीने भाष्य केले. पक्षाच्या बैठका कळविल्या जात नाहीत. फोटोत काही मोजकेच चेहरे दिसतात. ज्येष्ठांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, त्यामुळे मग आम्ही नेमके जायचे कोणाकडे, अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. त्यावरही जयंत पाटील यांनी संयतपणे उत्तरे दिली.

राणादादांनी नुकसान केले...
राणादादा हे पक्षाची धोरणे ठरवीत होते, आता त्यांना तिकडे धोरणे कळविली जात आहेत. त्यांचे स्वत:चेही नुकसान झाले अन् आपलेही, असे स्पष्टपणे सांगतानाच उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावंत होतात म्हणून आपण येथे थांबले आहात. तुमची कुचंबणा होऊ देणार नाही. ज्यांचे गट आहेत, त्या सर्वांना रात्रीच बोलावून घेत आजच समेट घडवून आणतो. तुम्ही सर्वजण चांगले काम करणारे आहात. हे गटतट विसरुन एकदिलाने मिळून काम करु, असे सांगत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचा प्रयत्न या संवादाच्या अखेरीस केला.

Web Title: 'Keep the Shivsena away'; Activists' tone in NCP's Pariwar Sanwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.