बिकट आर्थिक स्थितीमुळे शेतमजुराच्या मुलाचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 06:29 PM2019-07-31T18:29:43+5:302019-07-31T18:43:02+5:30

प्रवेशासाठी लागणारी लाखोंची रक्कम आणायची कोठून? असा प्रश्न शेतमजूर मुंडे कुटुंबासमोर उभा

Due to poor financial condition, the son of a farm laborer away from MBBS admission | बिकट आर्थिक स्थितीमुळे शेतमजुराच्या मुलाचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’

बिकट आर्थिक स्थितीमुळे शेतमजुराच्या मुलाचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’

googlenewsNext
ठळक मुद्दे गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी ४ लाख ६६ हजार रुपयांची आवश्यकता होतकरू विद्यार्थ्याचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’

- बालाजी आडसूळ

कळंब (जि. उस्मानाबाद) : शेतमजुराच्या मुलाने ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ या पंक्ती आपल्या जिद्दीने सत्यात उतरवल्या असल्या तरी परिस्थितीने मात्र त्यास जागीच जखडून ठेवले आहे. होय, ही संघर्षकथा आहे भोगजी येथील गोरख मुंडे या विद्यार्थ्याची. आईविना पोरक्या असलेल्या या शेतमजुराच्या मुलाचा ‘मेडीकल’ प्रवेश निश्चित झाला खरा. परंतु, यासाठी लागणारी लाखोंची रक्कम आणायची कोठून? असा प्रश्न शेतमजूर मुंडे कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. 

गोरख हा चौथीच्या वर्गात असतानाच आईचा सर्पदंशाने अकाली मृत्यू झाला. आईच्या मायेला पारखं झालेल्या गोरख व इतर दोन बहिणींसाठी पुढील काळात वडील तुकाराम मुंडे हेच ‘मातृ अन् पितृछत्र’ म्हणून लाभले. यात मुलगा गोरख हा जिद्दी, चिकाटीचा. अभ्यासात तर हुशारच, शिवाय काही तरी बनायचं अशी कायम इच्छाशक्ती बाळगणारा. यात मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी वडीलांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्याचा सदोदीत प्रयत्न केला. मात्र परिस्थिती  कायम अडथळे आणत होती. याही स्थितीत मुलगा गोरख याने मोठ्या जिद्दीने परिस्थीतीशी दोन हात करत स्वत:ला शिक्षणात झोकून दिलं. गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर सर्वोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. यानंतर कळंब येथे मोहेकर महाविद्यालयातून बारावी केली. या प्रवाहात डॉक्टर बनण्याची महत्वकांक्षा त्याला सतत धडपडत ठेवत होती. यासाठीच तो रात्रीचा दिवस करत होता.

या दरम्यान, मेडीकल प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील नीट परीक्षा गोरखने दिली. जूनमध्ये याचा निकाल लागला. यात गोरखने ५०५ गूण मिळवून देशपातळीवर ४६३४२ तर राज्यस्तरावर ३८८८ हा रँक मिळविली. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत होते. यशाच्या या खडतर प्रवासांती गोरखचा नुकताच सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला आहे. तसा पाहिला तर एमबीबीएसला लागलेला हा गावातील पहिलाच मुलगा. यामुळे गावानेही मोठं कौतूक केलं. वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याचे मोठ समाधान गोरखच्या चेहऱ्यावर दिसत होते. परंतु, या खर्चिक शैक्षणिक व्यवस्थेत आपली हलाखिची आर्थिक परिस्थीती तग धरून ठेवील का? ही भितीही त्याला सतावत होती. ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे तेथील ४ लाख ६६ हजार रूपये एवढे शैक्षणिक शुल्क व इतर खर्चाची रक्कम आगामी पाच दिवसात भरावी लागणार आहे. तरच प्रवेश निश्चित होणार आहे. या स्थितीत गोरख व त्याचे वडील तुकाराम यांच्याकडे एक छदामही शिल्लकीत नाही. ना तशी त्यांची ऐपत आहे. यामुळे कठीण स्थितीत यशाच्या पल्ला गाठलेल्या गोरखच्या मार्गात पुन्हा परिस्थितीच्या ‘स्पीड ब्रेकर’ने मोठा अडथळा आणल्यामुळे होतकरू विद्यार्थ्याचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’ बनला आहे.

मदतीचे हात पुढे येतील काय? 
गोरखला डॉक्टर व्हायचयं... यासाठी प्रवेश पात्रतेच्या कसोटीवर तो खरा उतरला आहे... आता प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या गोरखला पहिल्या वर्षी साडेचार तर त्यापुढील काळात शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रतिवर्ष अडीच लाख शुल्क भरावे लागणार आहे. खायचे वांदे असलेल्या मुंडे पिता-पुत्रापुढे हा ‘पैशाचा डोंगर’  कसा पार करावा हा मोठा प्रश्न आहे. यास्थितीत त्यांना मदतीची गरज आहे. मोहेकर महाविद्यालयाने आपल्या या विद्यार्थ्यासाठी पन्नास हजाराची मदत केली आहे. इतरांनीही मदतीसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Due to poor financial condition, the son of a farm laborer away from MBBS admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.