Corrupt engineers, contractors trapping money from farmers for DP | डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

ठळक मुद्देडीपी दुरुस्त होत नसल्याचे सांगून ६३ किलोवॅटऐवजी १०० किलोवॅटचा डीपी बसवून देण्यासाठी लाच घेतली

उस्मानाबाद : जळालेला डीपी बसवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱ्या नळदुर्ग ग्रामीण येथील एका अभियंत्यासह, तंत्रज्ञ व शासकीय ठेकेदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. पंचासमक्ष लाच घेतलेल्या या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

महावितरणच्या नळदुर्ग ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या शहापूर वीज उपकेंद्रांतर्गत कृषी पंपांना वीजपुरवठा करणारा एक डीपी जळाला होता. तो बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उपकेंद्रातील तंत्रज्ञ श्रीकांत साळुंके यांच्याकडे केली होती. मात्र, डीपी दुरुस्त होत नसल्याचे सांगून ६३ किलोवॅटऐवजी १०० किलोवॅटचा डीपी बसवून देण्यासाठी तंत्रज्ञ साळुंके याने शेतकऱ्यांकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. नळदुर्ग ग्रामीणचा सहायक अभियंता हनुमंत अशोक सरडे याने यातील पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर हा डीपी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय ठेकेदार अमित दशरथ उंबरे याने वेगळे ५५ हजार रुपये देण्यास सांगितले. 

दरम्यान, या सर्व प्रकाराची तक्रार शेतकऱ्यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्याकडे केली होती. त्यांनी तक्रारीची खात्री करून उस्मानाबाद एमआयडीसीतील आयुष ट्रान्सफार्मर इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीत गुरुवारी सायंकाळी सापळा रचला व ठेकेदार उंबरे याने शेतकऱ्याकडून ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी सहायक अभियंता हनुमंत सरडे, तंत्रज्ञ श्रीकांत साळुंके व ठेकेदार अमित उंबरे या तिघांविरुद्ध आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली आहे.

Web Title: Corrupt engineers, contractors trapping money from farmers for DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.