‘Aai Raja Udo Udo’s chanting for Ghatsthapana; Shri Tuljabhavani Devi's Autumn Navratri Festival begins | ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात घटस्थापना; श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

‘आई राजा उदो उदो’च्या गजरात घटस्थापना; श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

ठळक मुद्देसर्व घरोघरी पारंपारिक पद्धतीने घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.

तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’च्या गजरात व संबळाच्या वाद्यात तुळजाभवानी मंदिरात शनिवारी दुपारी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने घटस्थापना झाली. या घटस्थापनानंतर दिवेगावकर दांपत्याच्या हस्ते पुढील नऊ दिवसाच्या विविध धार्मिक पूजा विधीसाठी ब्रह्मवृंदास वर्णी देण्यात आली.

तत्पूर्वी शनिवारी पहाटे चरण तीर्थ पार पडले. त्यानंतर श्री तुळजाभवानीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष पंचामृत अभिषेक होऊन मानाच्या आरत्या व नैवेद्य हे विधी पार पडले. यानंतर अभिषेक घाट होऊन सकाळी नित्योपचार पंचामृत अभिषेक झाल्यानंतर अलंकार पूजा मांडण्यात आली. नैवेद्य, धुपारती, अंगारा हे विधी संपन्न झाल्यावर मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मनाची आरती केली. श्री गोमुख तीर्थावरील घट-कलशाची विधीवत पूजा करून घट, कलश संबळाच्या वाद्यात तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. या ठिकाणी दिवेगावकर दांपत्याच्या हस्ते देवी समोरील सिंह गाभाऱ्या पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंदिर परिसरातील उप देवतांच्या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली.

घट स्थापनेनंतर मंदिरात नऊ दिवस चालणाऱ्या विविध पूजा विधीसाठी स्थानिक ब्रह्मवृंदांना दिवेगावकर दांपत्याच्या हस्ते वर्णी देण्यात आली. यानंतर दिवेगावकर दाम्पत्यांनी गाभाऱ्यात जाऊन पूजा करून श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी महंत वाकोजीबुवा, शासकीय उपाध्याय बंडोपंत पाठक, विश्वस्त नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, सिद्धेश्वर इंतुले, अमरराजे परमेश्वर, सुधीर कदम, गब्बर सोंजी, सज्जनराव साळुंके, सुधीर रोचकरी, अविनाश गंगणे, उपाध्ये अनंत कोंडो, वेदशास्त्री नागेश अंबुलगे, शैलेश पाठक, मकरंद प्रयाग, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील यांच्यासह सेवेकरी, आराधी, गोंधळी उपस्थित होते. यानंतर शहरातील सर्व घरोघरी पारंपारिक पद्धतीने घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.

Web Title: ‘Aai Raja Udo Udo’s chanting for Ghatsthapana; Shri Tuljabhavani Devi's Autumn Navratri Festival begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.