लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. इथे त्यांनी रात्रभर गुहेत ध्यानधारणाही केली. ज्या ठिकाणी मोदींनी ध्यानधारणा केली ती गुहा केदारनाथ मंदिराच्या डावीकडे डोंगरात तयार करण्यात आली आहे. आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुहेत राहून आल्यामुळे या गुहेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि लोकांमध्ये याबाबत उत्सुकताही वाढली. महत्त्वाची बाब म्हणजे ही गुहा तुम्ही सुद्धा बुक करू शकता आणि इथे जाऊन ध्यानधारणा करू शकता.
केदारनाथमधील ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रूंद आहे. ही गुहा तयार करण्याचं काम एप्रिलमध्ये करण्यात आलं होतं आणि यासाठी साडे आठ लाख रूपये खर्च करण्यात आले. या गुहेला रूद्र गुहा असं नाव देण्यात आलं आहे.
३ दिवसांसाठी करू शकता बुकिंग
नेहरू गिर्यारोहण संस्थेने ही गुहा तयार केली असून केदारनाथमध्ये अशाप्रकारच्या पाच गुहा तयार करण्यात आलंय. ही पहिली गुहा ट्रायलसाठी तयार करण्यात आली होती. गुहेमध्ये एक व्यक्ती किमान ३ दिवसांसाठी बुक करू शकते. गरज असल्याच बुकिंगचा कालावधी वाढवला सुद्धा जाऊ शकतो. बुकिंग करणाऱ्या व्यक्तीचं आधी गुप्तकाशीमध्ये मेडिकल चेकअप केलं जाईल. त्यानंतर पुन्हा केदारनाथमध्ये मेडिकल चेकअप होईल.
गुहेत काय आहे व्यवस्था?
गुहा समुद्र सपाटीपासून साधारण १२, २५० फूट उंचीवर आहे. ही गुहा केदारनाथ मंदिरापासून साधारण २ किमी अंतरावर तयार करण्यात आली आहे. तर या गुहेत काही आवश्यक सुविधाही देण्यात आल्या आहेत. गुहेत बेड, टॉयलेट, वीज आणि टेलिफोनसारख्या आधुनिक सुविधा आहेत.
एका दिवसाचं किती लागणार पैसे?
९९० रूपयात एक दिवसाचं बुकिंग ठेवण्यात आलं आहे. जीएमवीएनकडून एकावेळचं जेवणही दिलं जाणार आहे. यासाठी वेगळे पैसे घेतले जातील. दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने ध्यान केंद्रापर्यंत जाणार रस्ता पूर्णपणे बर्फाने झाकला गेला आहे. त्यामुळे बुकिंग करणाऱ्यांना स्वर्ग रोहिणी कॉटेजमध्ये थांबवण्यात आलंय. स्थिती सामान्य झाल्यावर भाविकांना गुहेत थांबवलं जाईल.
कुठे करू शकता बुकिंग
वेबसाइट - gmvnl.in
फोन नंबर - ०१३५-२७४७८९८, २७४६८१७
ई-मेल - gmvn@gmvnl.in