अखेर द्रोणागिरीवरील (मृत) संजीवनीचा शोध संपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 17:50 IST2019-03-08T17:47:49+5:302019-03-08T17:50:26+5:30

रामायणात लक्ष्मणावर ज्या दिव्य वनौषधीचा उपचार करून त्याचे प्राण वाचवले, ती वनौषधी म्हणजे द्रोणागिरी पर्वतावरील ‘संजीवनी’. डॉ. आर. बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांच्या चमूला संजीवनी वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं.

A unique journey of dronagiri in search of sanjivani buti | अखेर द्रोणागिरीवरील (मृत) संजीवनीचा शोध संपला!

अखेर द्रोणागिरीवरील (मृत) संजीवनीचा शोध संपला!

डॉ. उदयकुमार पाध्ये

रामायणात लक्ष्मणावर ज्या दिव्य वनौषधीचा उपचार करून त्याचे प्राण वाचवले, ती वनौषधी म्हणजे द्रोणागिरी पर्वतावरील ‘संजीवनी’. डॉ. आर. बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांच्या चमूला संजीवनी वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं. या दिव्य मृतसंजीवनीने आतापर्यंत अनेक अभ्यासकांना चकवा आणि आधुनिक औषधविज्ञानाला आव्हान दिलेलं होतं. आजही या वनौषधीच्या शोधात द्रोणागिरीवर अनेक संशोधक भटकत आहेत.

जिथे केवळ पोहोचणे हे दिव्य असते. जिवंत राहणे हा चमत्कार असतो व सशस्त्र गस्त घालणे, ही एक अशक्यप्राय खरीखुरी परीक्षाच घेणाऱ्या सियाचीन ग्लेशियरच्या भागात तैनात जवानांना जीवदान देणारी, बलकारक, गोठवणाऱ्या तापमानात प्राणवायूची कमतरता असूनही स्फूर्ती देणारी, रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी, बदलत्या वातावरणातही तग धरण्यास साहाय्य करणारी व विशेष म्हणजे जैवरासायनिक युद्धात होणाऱ्या गॅमा किरणोत्सारापासून संरक्षण देणाऱ्या अशा एका अद्भुत वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं होतं. पंधरा हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या (ऊकऌअफ) प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांचा चमू आश्वस्त झाला होता.

डॉ. आर.बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणांमध्ये नोंदी प्रमाणित करण्याची व वारंवार त्या पाहण्याची लगबग काहीशी थांबली होती. चंबू, चंचूपात्र व परीक्षानळ्यांचा खणखणाटही स्थिरावला होता. प्राण्यांवर केले जाणारे वनौषधीचे प्रयोग विसावले होते. कारण, त्या वाल्मीकी रामायणाच्या जीर्णशीर्ण पोथीत उल्लेखलेली, मूर्च्छित लक्ष्मणाला जीवदान देणारी, बहुचर्चित, रहस्यमय, अनेक अभ्यासकांना अजूनपर्यंत चकवा देणारी व आधुनिक औषधविज्ञानाला आव्हान देणारी दिव्य मृतसंजीवनी अखेर हाती लागली होती. गढवाल-कुमाडच्या गिरीशिखरातील बर्फाळ कडेकपारीत पारंपरिक वैदूंच्या मदतीने केलेल्या अथक शोधकार्याला फळ लागलं होतं. पवनसुतानं मिळवलेल्या अष्टसिद्धींच्या जोरावर प्राप्त केलेली व त्याच्या रघुवंशप्रेमाचं द्योतक असलेली संजीवक बुटी बहुधा शोधली गेली होती.

रामायण लंकाकांडातील संदर्भानुसार श्रीराम, सीतेच्या सुटकेसाठी रावणाशी युद्ध करत होता. तेव्हा वानरसेना रावणाच्या हल्ल्याने हतबल झाली. ज्यावेळी शेषावतार लक्ष्मणाने पाहिले की, रावणपुत्र हा अधर्म व कपटाने लढत आहे, त्यावेळी चिडून त्याने मेघनादाचा रथ त्वरित मोडून टाकला व त्याच्या सारथ्याचे तुकडेतुकडे केले. मेघनादाला अंदाज आला की, आता प्राणसंकट ओढवले आहे व हा लक्ष्मण माझे प्राणच घेईल. दुष्ट मेघनादाने अत्यंत किरणोत्सारी असं वीरघातिनी हे तेजपूर्ण शक्ती अस्त्र लक्ष्मणावर सोडलं, जे त्याच्या छातीला लागले व त्यामुळे लक्ष्मणाला मूर्च्छा आली. त्याच्यावर उपचारासाठी श्रीलंकेतील सुप्रसिद्ध सिद्ध राजवैद्य, जो सुग्रीवाचा सासरा होता, तो सुषेण याला पाचारण करण्यासाठी हनुमान शरीराचा आकार लहान करून गेला. त्याने युद्धभूमीवरील मूर्च्छित लक्ष्मणाचे निदान करून कैलास व वृषभ पर्वतांवरील पहाडी भागात जाऊन प्राणरक्षक संजीवनी तत्काळ आणण्यास सांगितले.
सिद्ध वैद्य सुषेणच्या आज्ञेनुसार हनुमानाने आताच्या उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रभागात असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनीचा शोध घेतला. त्यासाठी त्याने स्थानिकांची मदत घेतली. मात्र, त्यानंतरही वनस्पतीची खात्रीशीर ओळख न पटल्यामुळे अधिक वेळ न दवडता त्याने औषधी पहाडाचा तो वनौषधी असलेला भागच उचलून आणला. सुषेण याने ताबडतोब त्या वनस्पतीचं औषधी मिश्रण लक्ष्मणाला पाजले व या दिव्य संजीवनी वनस्पतीच्या सिद्धकल्पामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले होते. द्रोणागिरीचा तो भाग हनुमानाने जैवविविधतेच्या रक्षणासाठी पुन्हा तेथे नेऊन ठेवला, असं बरेच जण मानतात, म्हणून अधिकाधिक संशोधक हे द्रोणागिरीवर अजूनही भटकताहेत. स्थानिकांकडून शेती करून किंवा जंगलातून काही जर्मन लोक परस्पर वनस्पती घेऊन जाताहेत. (पूर्वार्ध)

Web Title: A unique journey of dronagiri in search of sanjivani buti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.