भारतात अशी अनेक सौंदर्यस्थळं आहेत, ज्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. पण देशाचा कानाकोपरा फिरायचा तर ते आपल्या खिशालाही परवडायला हवं, नाही का? त्यासाठी अशा एका ट्रेनचे आयोजन केले आहे जी पंधरा दिवसात भारतभ्रमण करवते. तिच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आपल्या सुजलाम सुफलाम देशाचे वर्णन आपण अनेक गाण्यांतून ऐकले आहे, ते प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर पर्यटन प्रेमींसाठी आहे एक सुवर्ण संधी. रेल्वेची प्रवाशांसाठी अनोखी भेट म्हणजे 'जागृती यात्रा ट्रेन!' ही देशातील अशीच एक ट्रेन आहे जी वर्षातून फक्त एकदाच धावते. या ट्रेनमध्ये तरुण पर्यटकांची संख्या जास्त असते. कारण अटच तशी आहे. या ट्रेनमध्ये २१ ते २७ वयोगटातील तरुण उद्योजकांनाच प्रवास करता येतो. मात्र या ट्रेन मध्ये बुकिंग केल्याशिवाय तुम्हाला शिरताही येत नाही. त्यामुळे ते कधी, कसे व कुठे करायचे ही सगळी माहिती जाणून घ्या.
काय आहे जागृती ट्रेनचे वैशिष्टय?
जागृती यात्रा ट्रेनबद्दल असे म्हटले जाते की ही देशातील एकमेव ट्रेन आहे जी वर्षातून एकदाच धावते. ही ट्रेन २००८ पासून धावत आहे. या ट्रेनबद्दल असे म्हटले जाते की तिचे ध्येय 'उद्योगाच्या माध्यमातून भारताला अधिक सक्षम बनवणे आहे. अनेक यशस्वी उद्योजक या ट्रेनने प्रवास करतात. उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने ते भारताचा कानाकोपरा पाहतात. या ट्रेनमधून एका वेळी ५०० प्रवासी प्रवास करू शकतात.
कुठून सुरु होते ही ट्रेन?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून जागृती यात्रा ट्रेन सुरू होते. ही ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद येथून निघते आणि जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेशातील देवरिया, ओडिशातील ब्रह्मपूर, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, तामिळनाडूतील मदुराई आणि कर्नाटकातील बेंगळुरूमार्गे मुंबईला पोहोचते. आहे. भारतीय रेल्वेच्या परिपत्रकानुसार हा प्रवास एकूण १५ दिवसांचा असतो.
निवडचाचणीद्वारे केली जाते प्रवाशांची निवड
१०० रुपयांचा फॉर्म भरून या प्रवासासाठी तरुण उद्योजकांना आपले नाव नोंदवता येते, पण निवड होते ५०० जणांची! देशभरातून हजारो अर्ज येतात. निवड झालेल्या प्रवाशांना या पंधरा दिवसांत केवळ भ्रमंती नाही तर औद्योगिक प्रशिक्षणही दिले जाते.
या वर्षी कधी प्रवास करता येईल?
जागृती यात्रा ट्रेन दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. या वर्षी ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या सहलीसाठी नोंदणी अनिवार्य आहे.
रेजिस्ट्रेशन कुठे करता येईल?
जागृती यात्रेसाठी नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही https://www.jagritiyatra.com/index या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकता. याशिवाय, या सहलीशी संबंधित इतर माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही ९२०९२२६८५८ या फोन नंबरवर कॉल करू शकता. तुमचे प्रश्न info@jagritiyatra.com या मेल आयडीवर मेल करू शकता.