राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:00 IST2025-07-10T16:58:49+5:302025-07-10T17:00:03+5:30
New Zealand Travel : राजकुमार राव आणि पत्रलेखा आता 'टुरिझम न्यूझीलंड'चे 'ब्रँड अॅडव्होकेट' बनले आहेत.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आणि रिअल लाईफ कपल राजकुमार राव आणि पत्रलेखा आता 'टुरिझम न्यूझीलंड'चे 'ब्रँड अॅडव्होकेट' बनले आहेत. न्यूझीलंडने आज आपल्या नव्या '#BeyondTheFilter' या अभियानाची घोषणा केली, ज्यामध्ये या लोकप्रिय जोडीचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या मनमोहक निसर्ग सौंदर्याचा आणि तिथल्या अविस्मरणीय अनुभवांचा आस्वाद घेण्यासाठी भारतीय पर्यटकांना या अभियानाद्वारे खास आमंत्रण देण्यात आले आहे.
फक्त इन्स्टाग्राम नाही, खरा अनुभव!
आजकाल प्रवास म्हणजे फक्त सुंदर इन्स्टाग्राम पोस्ट्स आणि फिल्टर वापरून तयार केलेला कंटेंट असे समीकरण झाले आहे. याच्याच अगदी उलट '#BeyondTheFilter' अभियान एक वेगळा आणि नवा दृष्टिकोन घेऊन आला आहे. भारतीय पर्यटकांना केवळ इन्स्टाग्रामसाठी असणाऱ्या बनावट अनुभवांपेक्षा अस्सल आणि मनाला शांती देणारे क्षण अनुभवायला मिळतील, असे टुरिझम न्यूझीलंड म्हणत आहे. हे अभियान अशा पर्यटकांसाठी आहे, ज्यांना केवळ सुट्टी घालवायची नाही, तर स्वतःला पुन्हा शोधण्याची आणि नवचैतन्य मिळवण्याची इच्छा आहे.
राजकुमार आणि पत्रलेखा यांचा न्यूझीलंड अनुभव!
या अभियानासाठी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमध्ये चित्रीकरण केलेल्या एका मिनी-सीरिजमध्ये काम केले आहे. त्यांची ही सफर डोळ्यांना आनंद देणारी आणि भावनांनी समृद्ध करणारी आहे. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधील संस्कृतीचा अनुभव घेताना, त्यांनी प्राचीन सँक्चुअरी माउंटनमधील शांतता अनुभवली. तसेच, ऑकलंडच्या स्वच्छ पाण्यात आणि टौपोच्या जादुई आकाशात थरारक हॅलिकॉप्टर राईडचा अनुभव देखील घेतला. याशिवाय, त्यांनी हाका शॉपमध्ये माओरी संस्कृतीचे आदरातिथ्य (मनाकिटांगा) आणि नातेसंबंधांची अभिव्यक्ती (व्हानुनगटांगा) अनुभवताना त्यांनी प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद लुटला.
न्यूझीलंडने आम्हाला मनसोक्त भटकण्याची मुभा दिली!
या सफरीचा आपला अनुभव सांगताना अभिनेता राजकुमार राव म्हणाला की, "प्रवास म्हणजे आमच्यासाठी नेहमीच एकमेकांशी, निसर्गाशी आणि वाटेत भेटणाऱ्या लोकांशी जोडले जाणे असते. न्यूझीलंडने आम्हाला हे सर्व अनुभवण्याची संधी दिली आणि त्याहून खूप काही दिले. आम्ही एकमेकांसोबत घालवलेला वेळ खऱ्या अर्थाने अविस्मरणीय होता."
पत्रलेखानेही आपला अनुभव व्यक्त केला, "आपल्या आयुष्यात सतत सोशल मीडियासाठी जगत राहण्याच्या काळात न्यूझीलंडने आम्हाला केवळ मनसोक्त भटकंतीची मुभा दिली. येथील अनुभव इतके सुंदर आणि अस्सल होते की आम्ही आपोआपच फोन बाजूला ठेवले आणि त्या क्षणांचा आनंद लुटला."
डिजिटल ताणातून मुक्तता आणि खऱ्या अनुभवाकडे वाढता कल!
आजकाल भारतीय पर्यटकांमध्ये डिजिटल ताणापासून दूर राहून खरेखुरे अनुभवांना महत्त्व देण्याचा कल वाढत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. इथली प्राचीन जंगले, जादुई किनारे आणि उंच डोंगर, न्यूझीलंडच्या लोकांच्या उत्साहामुळे जिवंत होतात. हे असे अद्वितीय अनुभव देतात जे सोशल मीडिया कॅप्चर करू शकत नाही किंवा त्याची नक्कल करू शकत नाही.
टुरिझम न्यूझीलंडचा उद्देश काय?
टुरिझम न्यूझीलंडचे प्रादेशिक संचालक (आशिया) ग्रेग वॅफलबाकर म्हणाले की, "आम्हाला दिसतंय की भारतीय पर्यटकांचा वैयक्तिक, अविस्मरणीय आणि भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण अनुभव घेण्याकडे कल वाढत आहे आणि न्यूझीलंड या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार आहे. #BeyondTheFilter ही मोहीम सुंदर ठिकाणांपेक्षा न्यूझीलंडला अधिक काहीतरी दाखवण्याच्या प्रयत्न आहे. न्यूझीलंड केवळ एक सुंदर ठिकाण नाही, तर इथे संस्कृती, निसर्ग आणि नातेसंबंध एकत्र येऊन खरोखरच समृद्ध अनुभव देतात."
ते पुढे म्हणाले, "राजकुमार आणि पत्रलेखा त्यांच्या प्रामाणिकपणातून हा संदेश योग्य प्रकारे पोहोचवतात. सजग पर्यटनाबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि लोकांशी जोडले जाण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ते आमच्या अभियानासाठी आदर्श प्रतिनिधी आहेत. हे अभियान भारतीय पर्यटकांना खरे, हृदयस्पर्शी अनुभव घेण्यास प्रोत्साहित करेल."
कुठे बघाल राजकुमार राव आणि पत्रलेखाची ही मिनी-सीरिज?
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची ही खास मिनी-सीरिज newzealand.com/in वर आणि टुरिझम न्यूझीलंडच्या अधिकृत वाहिन्यांवर टप्प्याटप्प्याने प्रदर्शित केली जाईल. या मिनी-सीरिजचा पहिला भाग पाहण्यासाठी तुम्ही http://www.newzealand.com/beyondthefilter या लिंकवर क्लिक करू शकता.