राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील उपखंड कामां या ठिकाणाबाबत भलेही लोकांना फार जास्त माहीत नसेल. पण धार्मिक लोकांमध्ये या ठिकाणाला आध्यात्मिक रूपाने फार महत्वपूर्ण स्थान आहे. कामांचा काही भाग हा ब्रज भूमीला लागून आहे. जिथे भगवान कृष्णाने बालपण घालवलं होतं.
कामां या ठिकाणी तुळशीची झाडे अधिक प्रमाणात बघायला मिळतात. ज्यामुळे या ठिकाणाला आदी वृंदावन असंही म्हटलं जातं. पावसाळ्यात येथील चील महालात यात्राही भरते. याला परिक्रमा यात्रा असंही म्हटलं जातं.
याच क्षेत्रात राजस्थानचे काही प्रसिद्ध आणि मान्यता असलेली मंदिरे आहेत. यातील एक म्हणजे चौरासी खंबा(84 खांब) मंदिर हे आहे. या मंदिरात ८४ पिलर आहेत, ज्यावरून या मंदिराला हे नाव पडलं आहे. इथे कोणत्याच देवाची मूर्ती नाही. तसेच इथे कोणतीही पूजा केली जात नाही. तरी सुद्धा याला मंदिर म्हटलं जातं. असे मानले जाते की, या मंदिराचं भारतावर राज्य करणाऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी नुकसान केलं, ज्यामुळे या मंदिराचं मूळ रूप आता राहिलं नाही.
खांबांचं रहस्य
या मंदिराबाबतची एक विचित्र बाब पर्यटकांना इथे खेचून आणते. ती म्हणजे, चौरासी खंबा मंदिरात आजपर्यंत कुणीही खांबांची योग्य संख्या मोजू शकले नाहीत. कुणी तसा प्रयत्न केला तर एकतर खांबांची संख्या जास्त दिसतात नाही तर कमी दिसतात. जितक्यांदा तुम्ही हे मोजाल त्या त्या वेळी खांबांची संख्या वेगवेगळी निघते.
युधिष्ठिराची झाली होती परीक्षा
स्थानिक लोकांनुसार, या मंदिराजवळ असलेलं धर्मकुंड हे तेच स्थान आहे, जिथे युधिष्ठिरची परीक्षा घेतली गेली होती. महाभारतात या घटनेबाबत वाचायला मिळतं. पण यात किती तथ्य आहे, याचा कोणताही पुरावा मिळत नाही.