Indian Tourists flock to Maldives to cheat Corona! | कोरोनाला चकवण्यासाठी पर्यटक मालदीवकडे!

कोरोनाला चकवण्यासाठी पर्यटक मालदीवकडे!

मालदीव हा आशिया खंडातला सर्वांत कमी लोकसंख्येचा आणि सर्वांत कमी क्षेत्रफळाचा देश; पण जगातील सर्वाधिक सुंदर आणि निसर्गसंपन्न देशांत त्याची गणना होते. एकूण १२०० बेटांचा हा द्वीपसमूह हिंदी महासागराच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ वसलेला आहे. या देशात एकूण १२०० द्वीपसमूह असले तरी त्यातील केवळ २०० बेटांवरच लोकवस्ती आहे. या देशाला उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नाहीत; पण त्यांची निसर्गसंपत्ती हाच त्यांचा खूप मोठा ठेवा आहे. त्यामुळे जगभरातून दरवर्षी हजारो पर्यटक मालदीवला भेट देत असतात. पर्यटनावरच मालदीवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने चालते. 


पण कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातच पर्यटन बंद झाल्यानं ज्या देशांना सर्वाधिक फटका बसला त्यात मालदीवचा समावेश आहे; पण मालदीव आता त्यातून बाहेर पडू पाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी अजूनही पर्यटनावर बंदी असताना आणि त्या त्या देशांत गेल्यानंतर किमान १४ दिवस विलगीकरणाची सक्ती असताना मालदीवने पर्यटनासंबंधीचे आपले अनेक नियम शिथिल केले आहेत. कोणत्याही देशांतून मालदीवकडे निघताना चार दिवस आधी केलेली कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल, तरी मालदीवला आल्यावर पुन्हा त्यांना कोणत्याही टेस्टची गरज नाही, शिवाय १४ दिवस विलगीकरणातही राहावे लागत नाही. या संधीचा फायदा घेत भारतीय पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात मालदीवकडे ओघ सुरू आहे. याची कारणं दोन. एकतर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनामुळे लोकांच्या बाहेर फिरण्यावर मोठ्या प्रमाणात बंधनं आली होती. वर्षभरापेक्षा जास्त काळ घराबाहेर  न पडता आलेल्या लोकांना पर्यटनाची आस लागलेली आहे. किमान काही दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात, कोरोनाच्या भीतीपासून दूर राहावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा यासाठी पर्यटक आसुसलेले आहेत. त्याचवेळी अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या टप्प्यात भारतात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. रुग्णांची संख्या गणिती वेगाने वाढते आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन काही दिवस राहावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे.

मालदीवनं पर्यटनावरची बंधनं सैल केल्याबरोबर भारतीय पर्यटकांनी तिथे रांगा लावल्या आहेत. 
मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या एकीकडे वाढत असताना, दुसऱ्या देशांतील पर्यटकांची संख्या मात्र जवळपास शून्यावर आली आहे. चीन, जपान आणि दक्षिण कोरियाचे पर्यटकही दरवर्षी मोठ्या उत्साहानं मालदीवला हजेरी लावतात, पण मालदीवमधले तिथले पर्यटक तब्बल ९८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मालदीवमधील भारतीय पर्यटकांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत आत्ताच ५० टक्क्यांनी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीतच मालदीवला तब्बल ४४ हजार पर्यटकांनी भेट दिली. गेल्या संपूर्ण वर्षाच्या म्हणजे २०२० च्या तुलनेत ती दुप्पट होती.  


पर्यटनाशी संबंधित भारतीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे, अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. लसीकरण सुरू झालं असलं तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येला लस देण्यासाठी बराच काळ लोटेल, शिवाय अनेक ठिकाणी लॉकडाऊन आता पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून भारतीय पर्यटक मालदीवला पसंती देत आहेत. 


कोलकाताच्या  अगवानी ट्रॅव्हल्सचे संचालक प्रदीप शर्मा सांगतात, मालदीव अगोदर हाय एंड डेस्टिनेशन मानले जात होते, पण आता तिथले हॉटेलवालेही लोकांना अत्यंत आकर्षक डील देत आहेत. दक्षिण आशिया पर्यटनासाठी जवळपास संपूर्णपणे बंद आहे. थायलंडही अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनीही मालदीवला पहिली पसंती दिली आहे. स्थानिक विमानसेवाही पर्यटकांना स्वस्त आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत. ‘विस्तारा’ एअरलाइन्सने मुंबई आणि मालदीवची राजधानी मालेपर्यंत नॉनस्टॉप हवाईसेवा सुरू केली आहे. मालदीव सरकारनंही पर्यटकांवरची बरीच बंधनं उठवली आहेत, त्याचवेळी ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी बाहेरच्या देशांतून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण अत्यावश्यक केलं आहे. दुबईलाही अनेक भारतीय पर्यटक जातात; पण सध्या तिथे कडक उन्हाळा सुरू आहे आणि तिथे पोहोचल्यावर कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांचा मालदीवकडे ओढा वाढतो आहे. 

देशच दुसरीकडे हलवणार!
जलवायू परिवर्तनाच्या धोक्यामुळे जे देश संकटात सापडले आहेत, त्यात मालदीवचा नंबर खूप वरचा आहे. समुद्राच्या पातळीपासून हा देश खूपच जवळ आहे. समुद्राच्या पातळीत जर काही मीटरने वाढ झाली, तर हा निसर्गसंपन्न देश संपूर्णपणे पाण्यात गडप होण्याची भीती आहे. त्यासाठीही मालदीव सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जगात दुसरीकडे जागा खरेदी करून तिथे देशातल्या सगळ्या लोकांचं स्थलांतर करायचं अशीही एक योजना आहे. त्यासाठीही मालदीव सरकारला लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा उभा करायचा आहे.

Web Title: Indian Tourists flock to Maldives to cheat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.