यंदाच्या गणेश उत्सवात करा भारतातल्या पुरातन गणेश मंदिरांचं पर्यटन. या मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 07:09 PM2017-08-11T19:09:06+5:302017-08-11T19:20:23+5:30

तुम्ही यंदाच्या गणेश चतुर्थीला भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन गणरायाचा उत्सव साजरा करु शकता.गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण अष्टविनायकाच्या यात्रेला जातात. पण यावर्षी केवळ आपल्या राज्यातल्याच नाही देशातल्या अशा पुरातन गणेश मंदिरांना भेट द्यायला काही हरकत नाही.

to celebrate this ganesh festival by visit these 10 ancient Ganesh Temple in india. | यंदाच्या गणेश उत्सवात करा भारतातल्या पुरातन गणेश मंदिरांचं पर्यटन. या मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा!

यंदाच्या गणेश उत्सवात करा भारतातल्या पुरातन गणेश मंदिरांचं पर्यटन. या मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा!

googlenewsNext
ठळक मुद्दे* सिद्धिविनायक हे गणेशाचं मुंबईतलं सर्वांत लोकप्रिय स्थान.* राजस्थानातल्या रणथंबोर किल्ल्यावरच्या महालात गणपतीचं पुरातन मंदिर आहे. जवळपास 1 हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे.* उच्ची पिल्लैयार मंदिर, रॉकफोर्ट. चोल राजांनी डोंगरातले दगड फोडून या मंदिराची निर्मिती केली.

- अमृता कदम





कुठल्याही कार्याचा शुभारंभ हा श्री गजाननाच्या पूजनानेच केला जातो. महाराष्ट्रात तर गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. बाप्पांचं थाटात आगमन होतं आणि दहा दिवस त्यांच्या कोडकौतुकात अवघा महाराष्ट्र दंग होतो. अनेकांच्या घरी दीड, पाच, सात किंवा दहा दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापनाही होते. तुमच्या घरी जर गणपती बसत नसेल तर तुम्ही यंदाच्या गणेश चतुर्थीला भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन गणरायाचा उत्सव साजरा करु शकता.गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण अष्टविनायकाच्या यात्रेला जातात. पण यावर्षी केवळ आपल्या राज्यातल्याच नाही देशातल्या अशा पुरातन गणेश मंदिरांना भेट द्यायला काही हरकत नाही.


सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

सिद्धिविनायक हे गणेशाचं मुंबईतलं सर्वांत लोकप्रिय स्थान. ज्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला वळलेली असते ते मंदिर सिद्धपीठाशी जोडलेलं असतं असं मानतात. अशा गणेशमूर्ती असलेली मंदिरं ही ‘सिद्धिविनायक’ म्हणून ओळखली जातात. सिद्धिविनायकाचा महिमा फार मोठा असल्याचं म्हटलं जातं. भक्तांची मनोकामना ते लवकर पूर्ण करतात. पण हे गणराय जितके लवकर प्रसन्न होतात, तितक्या लवकर ते क्रोधितही होतात अशी आख्यायिका आहे. मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर तर केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे.
 

रणथंबोर गणेशजी, राजस्थान

राजस्थानातल्या रणथंबोर किल्ल्यावरच्या महालात गणपतीचं हे पुरातन मंदिर आहे. जवळपास 1 हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तीन नेत्र असलेली गणेशमूर्ती हे या मंदिराचं प्रमुख आकर्षण. शेंदुरी रंगातली ही मूर्ती पाहण्यासाठी देशिवदेशातले लोक इथे हजेरी लावतात. शिवाय मंदिरासमोरची उंदीरमामांची मूर्तीही बाप्पांना तितकीच साजेशी आहे.

मंडई गणपती, पुणे

या गणपतीला अखिल मंडई गणपती नावानंही ओळखलं जातं. पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेत या गणेश मंडळाचं खास महत्व आहे. पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींपैकी हा एक गणपती आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान तर इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. हा गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याति आहे.
 

उच्ची

 

पिल्लैयार मंदिर, रॉकफोर्ट

दक्षिण भारतात तामिळनाडूच्या त्रिची शहरात हे मंदिर आहे. विशेष म्हणजे शहराच्या मधोमध असलेल्या डोंगरांच्या शिखरावर हे मंदिर असल्यानं त्याची शोभा आणखी वाढते. चोल राजांनी डोंगरातले दगड फोडून या मंदिराची निर्मिती केली. डोंगराच्या शिखरावर वसलेला हा गणपती असल्यानं त्याला स्थानिक भाषेत ‘उच्चटी पिल्लैयार’ असंही म्हणतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, पुणे

श्रीमंत दगडूशेठ गपणतीवर भक्तांची किती श्रद्धा आहे हे वेगळं सांगायला नको. या गणपतीला कुणी फुलांची आरास करतं तर कुणी सोन्यानं मढवतं. कुणी मिठाईनं बाप्पांना सजवतं तर कुणी नोटांची आरास करु न मंदिर व्यापून टाकतं. अक्षयतृतीयेच्या दिवशी तर दगडूशेठला केली जाणारी आंब्यांची आरास अगदी खास बघण्यासारखी असते.

कनिपक्कम विनायक मंदिर, चित्तूर

आंध्रप्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातल्या या कनिपक्कम विनायक मंदिराशी आस्था आणि चमत्काराच्या अनेक कहाण्या जोडलेल्या आहेत. 11 व्या शतकात चोल राजा कुलोतुंग प्रथमन या मंदिराची स्थापना केली. त्यानंतर 1336मध्ये याचा समावेश विजयनगर साम्राज्यात झाला. जितकं पुरातन हे मंदिर आहे, तितकीच रोमांचक त्याच्या निर्मितीमागची कहाणी. दरदिवशी इथल्या गणपतीचा आकार वाढत असल्याची आख्यायिका प्रचलित आहे. शिवाय घरामध्ये काही तंटा झाल्यास इथं येऊन प्रार्थना झाल्यास सगळे वैरभाव दूर होतात असंही मानलं जातं.

मनाकुला विनायगर मंदिर, पॉण्डिचेरी

पॉण्डिचेरीच्या समुद्रकिनार्यापासून अगदी जवळ असलेलं हे गणेशाचं मंदिर. इथे येणार्या प्रत्येक पर्यटकासाठी हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. प्राचीन काळातलं मंदिर असल्यानं भाविकांचा या मंदिराकडे ओढा अधिक आहे. फ्रेंचांनी पॉण्डिचेरी ताब्यात घेण्याआधीपासूनचं हे मंदिर असल्याचं सांगतात. देशाच्या कानाकोपर्यातून इथे भाविक दर्शनासाठी येतात.

मधुर महागणपती मंदिर, केरल
या मंदिराबद्दलची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथं सुरूवातीला भगवान शंकराचं मंदिराचं होतं. पुराणकथेनुसार एका पुजार्याच्या मुलाला दृष्टांत मिळाल्यानंतर त्यानं इथं गणपतीची मूर्ती साकारली. पुजार्याचा हा मुलगा अगदी लहान होता. खेळता खेळता गाभार्यातल्या मंदिरावर त्यानं बनवलेली ही प्रतिमा नंतर मोठी होत गेली. त्या काळापासूनच त्याचं रूपांतर एका लोकप्रिय गणेश मंदिरात झालं.

गणेश टोक, गंगटोक, सिक्किम

भारत चीन सीमेवर अगदी टोकाला वसलेलं हे गणेश टोक मंदिर. गंगटोक-नाथुला रोडपासून अवघ्या 7 किमी अंतरावरचं. जवळपास साडेसहा हजार फुटांवर वसलेलं. या मंदिराच्या बाहेर उभं राहिल्यावर तुम्हाला संपूर्ण शहराचं मनोहारी दर्शन घडतं जे तुम्हाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातं.

मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर

जयपूरमधल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी हे मंदिर. जयपूरवासियांच्या आस्थेचं एक प्रमुख केंद्र. इतिहासकारांच्या मते या मंदिरातल्या गणेशाची स्थापन जयपूर नरेश माधोसिंह प्रथम यांच्या काळात म्हणजे 1761 साली झाली होती. या मंदिरात वसवण्यासाठी खास गुजरातहून आणलेली ही मूर्ती 500 वर्षे पुरातन होती असं सांगतात. जयपूरचा मुनीम सेठ पल्लीवाल यानं ही मूर्ती शोधून आणली होती. त्याच्याच देखरेखीत मोती डुंगरीत या मंदिराचं काम पूर्ण झालं.

 

Web Title: to celebrate this ganesh festival by visit these 10 ancient Ganesh Temple in india.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.