पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 12:21 IST2019-06-12T12:19:03+5:302019-06-12T12:21:13+5:30
पावसाला सुरूवात झाली की, सर्वांनाच पावसात चिंब भिजण्याची आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाण्याची इच्छा असते.

पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
(Image Credit : Swiss Family Fun)
पावसाला सुरूवात झाली की, सर्वांनाच पावसात चिंब भिजण्याची आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाण्याची इच्छा असते. मग काय लोक हिल्स स्टेशन, वॉटरफॉल, डॅम, समुद्र किनारे असं कुठे कुठे फिरायला जाता येईल याचा शोध घेऊ लागतात. खासकरून तरूण मंडळी याबाबतीत जरा जास्तच उत्साही असते. पावसाचा आनंद घेणं, फिरायला जाणं हे सगळं ठिक आहे पण पावसाचा आनंद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही खबरदारी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी काही लोक धरणात बुडून किंवा नदीच्या पात्रात बुडून मरण पावल्याच्या घटना आपण ऐकत असतो. त्यामुळे लहान मुलं, तरूण, वयोवॄद्ध लोकांनीही फिरायला गेल्यावर विविध प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरून तरूण मंडळीनी जास्त जोशात येणे चुकीचे आहे. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. यातून अशाप्रकारच्या घटना टाळता याव्या हाच उद्देश आहे.
१) बाईकने प्रवास टाळा
(Image Credit : BikeBandit.com)
तरूण मंडळी पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाण्यात जास्त उत्सुक असतात. हिल्स स्टेशन, डॅम, नदी अशा ठिकाणी तरूण मंडळी अधिक जातात. बाईकने जाण्याचा अनेकांचा हट्ट असतो. पण पावसाळ्यात पावसामुळे अनेक रस्त्यांची स्थिती वाईट झालेली असते. रस्त्यावरील डबक्यात पाणी साचल्याने ते आढळत नाहीत, अशात अपघात होण्याची जास्त शक्यता असते. रस्त्यावर चिखल आल्याने बाईक स्लिप होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अनेकजण ड्रिंक करून रेसिंग करण्यातही धन्यता मानतात, पण हे धोक्याचे आहे. त्यांनी असे करून जीव धोक्यात घालवू नये.
२) ड्रिंक टाळा
(Image Credit : BBC.com)
अनेकजण पावसाळ्यात पिकनीकला जाताना ड्रिंक करतात. ड्रिंक केल्यानंतर आलेल्या नशेत अनेकजण नदीत, समुद्रात पोहण्यासाठी जातात. अनेकजण तर स्विमिंग येत नसूनही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नदीत उड्या घेतात. मग पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडतात. शिवाय ड्रिंक केल्यावर शरिर जड होत असल्याने लवकर स्वत:चा बचावही करता येत नाही. त्यामुळे पिकनीकला ड्रिंक करणे हे धोक्याचे आहे.
३) शो ऑफ करू नका
अनेक ठिकाणी तरूणांप्रमाणे काही तरूणीही पिकनीकला आलेल्या असतात. अशात तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी उगाच काहीही जास्तीचं काम करण्याचा मोह टाळा. अनेकजण तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी नदीत, समुद्रात फिल्मी स्टाईलने उड्या घेतात. बाईकवरुन स्टंट करतात. पण या गोष्टी तुम्हाला महागात पडू शकतात.
४) कुणी सांगतंय म्हणून
(Image Credit : Video Blocks)
नदीत, समुद्रात उडी मारायला किंवा डोंगराच्या टोकावर जाऊन उभे राहण्यासाठी कुणी जर तुम्हाला फोर्स करत असेल आणि मोठेपणा म्हणून तुम्ही मोठ्या जोशात असं काही करत असाल तर सावधान व्हा. पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रात गाळ साचलेला असतो. तर समुद्रातील पाण्याचा अंदाज येत नाही. शिवाय समुद्राच्या लाटा तुम्हाला तग धरू देत नाहीत. त्यामुळे उगाच जोशमध्ये येऊन काही करू नका. जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तर पाण्याबाहेर राहूनही तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता.
५) सेल्फीचा मोह टाळा
डोंगराच्या टोकावर, समुद्रात, वाहत्या नदीच्या कडेला असे सेल्फी घेण्याचा मोह या दिवसात करू नका. सेल्फीचा अलिकडे सर्वांनाच नाद लागलाय. दुसरीकडे सेल्फीमुळे जीव जाणा-यांच्या संख्येतही वाढ होते आहे. वेगळा सेल्फी घेण्यासाठी तरूण मंडळी कशाचाही विचार करत नसल्याचे दिसून आले आहे. अशात निसर्गाशी खेळ करण्याचा मोहही टाळला पाहिजे.
६) ट्रेकिंग करताना काळजी घ्या
वेगवेगळ्या शहरांमध्ये ट्रेकिंगला जाणारे अनेक ग्रुप्स आहेत. तरूण-तरूणींचे हे ग्रुप्सही पावसाळ्यात ट्रेकिंगला जातात. पण पावसाळ्यात डोंगर भिजलेले असतात. अनेक ठिकाणी पाणी मुरल्याने अनेक भाग भुसभुशीत झालेले असतात. भलेही तुमच्याकडे ट्रेकिंगसाठी आवश्यक गोष्टी असल्या तरी डोंगरावर चिखल झाल्याने घसरण्याची भीती अधिक असते, त्यामुळे काळजी घ्या.
७) मेडिकल किट
या दिवसात कुठेही पिकनीकला जाताना सोबत एक मेडिकल किट असणं गरजेचं आहे. काही हो अथवा न हो सोबत असलेली बरी. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथे काहीही होऊ शकतं. अशी ठिकाणं शहरांपासून किंवा गावांपासून जरा लांब असतात. अशावेळी काही झाल्यास वेळेवर मदत न मिळाल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक मेडिकल किट सोबत ठेवाच.