मॉन्सूनमध्ये 'या' ५ ठिकाणांच्या पडाल प्रेमात, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 13:17 IST2019-06-29T13:16:51+5:302019-06-29T13:17:21+5:30
रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं?

मॉन्सूनमध्ये 'या' ५ ठिकाणांच्या पडाल प्रेमात, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!
मॉन्सूनमधील वातावरण हे फिरायला जाण्यासाठी फारच चांगलं असतं. रोड ट्रिप असो वा सोलो किंवा मित्रांसोबत मस्ती-मजी करण्यासाठी खास वेळ मानला जातो. पण अनेकांना या दिवसात वेगळा अनुभव घेण्यासाठी कुठे जावं हेच माहीत नसतं. किंवा नेहमीच्या ठिकाणांवर जाऊन जाऊनही कंटाळा आलेला असतो.
रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं? काही ठिकाणांची सुंदरता हिवाळ्यात वाढते तर काही ठिकाणांची उन्हाळ्यात. तसंच काही ठिकाणांचं सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलतं. अशाच ५ ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अलेप्पी
अलेप्पीला अलप्पुजहा असंही म्हटलं जातं. अलेप्पी हे ठिकाण एखाद्या चित्रकाराने रेखाटलेल्या सुंदर चित्रासारखं आहे. इथे नदी आहेत, दऱ्या आहेत, बॅकवॉटर्स आहे आणि ८२ किलोमीटर लांब समुद्र किनाराही आहे. हे ठिकाण केरळ राज्यातील तीन मोठ्या नद्या मनीमाला, पम्बा आणि अचंकोविलच्या संगमासाठीही लोकप्रिय आहे.
कुठे फिराल?
अलेप्पी बीच, मरारी बीच, इंटरनॅशनल कॉयर म्युझिअम, कुमारकोम पक्षी संग्रहालय, सेंट एंड्रयूज बेसिलिका, सेंट मेरी चर्च.
कसे पोहोचाल?
इथे पोहोचणे फार काही कठीण नाही. मरारी बीच मरारीकुलम रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. इथे तुम्ही रेल्वेने पोहोचू शकता. तसेच इथे बसेस-टॅक्सीची देखील सुविधा आहे.
कोडाइकनाल
तामिळनाडूतील कोडाइकनाल हिल स्टेशनला हिल स्टेशनांची राजकुमारी असंही म्हटलं जातं. हे ठिकाण २१९५ मीटर उंचीवर आहे. हिरवेगार घनदाट जंगल आणि वेगवेगळे प्राणी येथील आकर्षण आहे.
कुठे फिराल?
कोडाइकनाल लेक, गुना केव, वाताकनाल फॉल्स, पांबर फॉल्स, पेरूमल पीक, मानावनुर लेक.
कसे पोहोचाल?
मदुरे एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन दोन्ही येथून जवळ आहे. तसेच तामिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसेसही इथे सुरू असतात.
लोणावळा
लोणावळ्याचं खरं सौंदर्य पावसाळ्यात खुलतं. हे ठिकाण पुण्यापासूनही जवळ आणि मुंबईपासूनही जवळ आहे. पावसाळ्यात इथे सगळीकडे तुम्हाला सुंदर डोळ्यांना वेगळाच आनंद देणारी हिरवळ आणि धबधबे बघायला मिळतील. डोंगरांवरून खाली कोसळणारं पाणी बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.
कुठे फिराल?
टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट, कारला लेणी, भाजा लेणी, कुने फॉल्स.
महाबळेश्वर
मॉन्सूनमध्ये रोमॅंटिक ठिकाण शोधत असाल तर महाबळेश्वर परफेक्ट ठिकाण आहे. कधी मुसळधार पाऊस तर कधी रिमझिम धारा, सगळीकडे परसलेलं धुकं आणि हिरवीगार झाडं असं मनमोहक वातावरण आणि चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल.
कुठे फिराल?
पवना डॅम, वेना लेक, मेप्रो गार्डन, प्रतापगढ किल्ला, लिंगमाला फॉल्स, पारसी पॉईंट
वायनाड
वायनाड हे खासकरून मॉन्सून डेस्टिनेशन म्हणूनच ओळखलं जातं. केरळमधील या सुंदर ठिकाणाचा अंदाज तुम्ही इंटरनेटवर केवळ फोटो बघून लावू शकत नाही. येथील सौंदर्य शब्दात सांगता येणार नाही असंच आहे. सुंदर धबधबे, वाइल्डलाईफ आणि दुसरीकडे हिरवीगार मैदाने येथील आकर्षण आहे. पावसाळ्यात इथे तीन दिवस मॉन्सून टूरिज्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं.
कुठे फिराल?
बानसुरा सागर डॅम, चेंब्रा पीक, कुरुवा आइलॅंड, मुथंगा वाइल्डलाईफ सेंचुरी, इडक्कल गुहा.
कसे पोहोचाल?
केरळच्या सर्वच मोठ्या शहरांमधून वायनाडला पोहोचण्यासाठी सुविधा आहेत. कोझीकोड एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन इथे पोहोचण्यासाठी जवळचा पर्याय आहे.
चेरापूंजी, मेघालय
चेरापूंजी हे भारतातील सर्वात जास्त पाऊस होणारं किंवा वर्षभर पाऊस होणारं ठिकाण आहे. त्यामुळे हे ठिकाण इतर ठिकाणांपेक्षा सर्वात वेगळं आणि सुंदर ठरतं. येथील धबधबे फारच आकर्षक आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या वेगळ्या अनुभवासाठी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.
कुठे फिराल?
लीविंग रूट ब्रिज, वाकाबा फॉल्स, थांगखारंग पार्क, माव्समई गुहा.
कसे पोहोचाल?
चेरापूंजीपर्यंत रस्ते मार्गाने सहजपणे पोहोचता येतं. गुवाहाटी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण १५० किमी अंतरावर आहे. तर एअरपोर्टपासून १७० किमी अंतरावर.