कान्होरच्या जिल्हा परिषदेच्य केंद्र शाळेने साकारली बोलकी परसबाग
By सुरेश लोखंडे | Updated: October 12, 2023 18:25 IST2023-10-12T18:25:23+5:302023-10-12T18:25:51+5:30
पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला क्यू आर कोड शाळेचे शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी दिला आहे.

कान्होरच्या जिल्हा परिषदेच्य केंद्र शाळेने साकारली बोलकी परसबाग
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या अंबरनाथ तालुक्यातील कान्होरच्या जि.प. शाळेत आज राेजी ८१ विद्याथीर् शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी, शिक्षक व शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने बाेलकी सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात उदयाला आली आहे. या परसबागेमुळे शाळेचे नाव माेठ्याप्रमाणात प्रसिध्द झाले आहे.
पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला क्यू आर कोड शाळेचे शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी दिला आहे.हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रत्येक झाड स्वतः बोलू लागते, म्हणजेच ते झाड स्वतःचे नाव, उपयोग, गुणधर्म, पोषणमूल्य इत्यादी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. या परसबागेत अळूची पाने, काकडी, भोपळा, दोडकी, कारली, डोंगर, चवळी, कडीपत्ता, तोंडली ,औषधी वनस्पती, अडुळसा, तुळस, कोरफड, पानफुटी आदी झाडे वाऱ्याच्या झुळकवर डाेलत आहे. परसबागेमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीकता वाढली आहे.
विद्यार्थी निसर्ग व पर्यावरणाशी एकरूप होउन परसबागेतील तयार होणार्या शाळेतील भाज्या यांचा मुलांच्या दैनंदिन पोषण आहारात समावेश केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर होऊन विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळण्यासाठी मदत हाेत असल्याचा अनुभव जिल्ह्यातील अन्यही शाळांच्या परसबागांमधून प्राप्त झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कमल फसले यांच्या मार्गदर्शनाखाली या बाेलक्या परसबागेचा उदय झाला आहे. या परसबागेच्या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध अधिकाऱ्यांनी भेट देउन काैतूक केले आहे.