कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:53 IST2025-10-20T09:53:09+5:302025-10-20T09:53:09+5:30
ठाण्यात काळी दिवाळी साजरी करून राज्य सरकारविरोधात आंदोलन

कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्य सरकारच्या आश्वासनानंतरही कायमस्वरूपी रोजगाराच्या मागणीची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार युवक-युवतींनी ठाण्यात संविधान चौक, कोर्ट नाका येथे रविवारी आंदोलन छेडले. ‘काळी दिवाळी’ साजरी करत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला.
राेजगाराची हमी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदाेलन छेडणाऱ्या युवा, युवतींचे नेतृत्व बालाजी पाटील-चाकूरकर करत असून, या ठिय्या आंदोलनात राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. पाेलिसांनी आंदाेलनाच्या ठिकाणी चाेख बंदाेबस्त ठेवला होता. येथील सरकारी विश्रामगृहासमाेरील रस्त्यावर आंदाेलकांनी ठिय्या मांडून प्रशासनासह ठाणेकरांचे लक्ष वेधले.
आंदोलकांचे म्हणणे काय?
निवडणूकपूर्व घोषणा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडके भाऊ-बहीण’ योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत एक लाख ६६ हजार युवक-युवतींना ११ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, सरकारी सेवेत समावेश वा त्यासाठी दिशा स्पष्ट नाही. प्रशिक्षण प्रमाणपत्रांनाही सरकारी वा खासगी मान्यता मिळालेली नाही, असा आराेप करण्यात आला.
मामाच्या गावी आलो पण...
‘उपमुख्यमंत्री शिंदे यांचेच ठाणे हे ‘मामाचे गाव’ मानून येथे आलो आहे. पण आज आम्ही दिवाळी नव्हे, काळी दिवाळी साजरी करत आहोत!’ असे म्हणत त्यांच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.