परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक, उल्हासनगरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 14:13 IST2018-01-22T14:13:03+5:302018-01-22T14:13:46+5:30
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक, उल्हासनगरातील प्रकार
उल्हासनगर- परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले.
उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरात मनिष कुकरेजा कुटुंबासह राहतो. पवई चौक परिसरात राहणा-या दिनेश शर्मा यांने मनिष यांना ऑफिसमध्ये बोलावून, परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मेडिकल व कागदपत्र पाठविण्यास सांगून २५ हजार रूपयाची फि घेतली. वेस्ट इंडिज येथील सेंट किड्स येथे दरमहा ५०० डॉलरची नोकरी मिळाल्याचे सांगून, वर्क परमिट व व्हिजा काढून जून २०१६ रोजी पाठविले. मनिष कुकरेजा यांने सेंट किड्स येथे जुन २०१६ ते २०१७ पर्यंत काम केले. सुरूवातीला पहिल्या महिन्याचा पगार दिल्यानंतर, इतर महिन्याचा पगार दिला नाही. याविरोधात मनिष यांनी तेथील हाय कमिशन इंडिया मध्ये तक्रार केली. त्यानंतर २६९९ डॉलरचा चेक देण्यात आला.
मनिष कुकरेजा यांना चेक देण्यात आल्यावर, तेथिल लेबर विभागाने येथे काम करता येणार नाही. तुम्हाला भारतात जावे लागेल, असे स्पष्ट सांगितले. मार्च २०१७ रोजी भारतात परत आल्यावर, आपली फसवणूक झाल्याचे मनिष कुकरेजा यांच्या लक्षात आले. नोकरीचे आमिष दाखविणा-या दिेनेश शर्मा यांच्याकडे नोकरीसाठी परदेशात पाठविण्याचा कोणताही परवाना नाही. पैश्यासाठी नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक करत असल्याचे समजले. अखेर मनिष कुकरेजा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेवून दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दिनेश शर्मा यांची चौकशी करून, पुढील कारवाईचे संकेत मध्यवर्ती पोलिसांनी दिले.