ठाणे : येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डाेंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर (१८) याच्यासह दहा मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने साेमवारी दिली. ही मुले ट्रेकिंगसाठी डाेंगरात गेली हाेती, त्यांना मधमाशा चावल्या. त्यामुळे भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पाेलिसांना दिली.
साेमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयाेगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांना मिळाली हाेती. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ऋषी याच्यासह समर्थ मयेकर (रा. घणसोली, नवी मुंबई), प्रणव परब (रा. विक्रोळी, मुंबई), वरद बासा (रा. विक्रोळी, मुंबई), सोहम देशमुख (रा. वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे), कुणाल पानमंद (रा. घाटकोपर, मुंबई), तन्मय नाईक (रा. मुलुंड, मुंबई), रोहन गरुड ( रा. मुलुंड, मुंबई), अलोक यादव (रा. कळवा, ठाणे) आणि आर्य यादव (रा. कांजूरमार्ग, मुंबई) या दहा मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका केली. या मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि साेहम या तिघांना एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.