पेट्रोल ओतून तरूणाने भर रस्त्यात पेटवून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:27 IST2017-10-02T00:27:35+5:302017-10-02T00:27:43+5:30
मित्राने आपल्या नावावर घेतलेल्या मोबाईल खरेदीच्या कर्जाचे हप्ते फेडत नसल्याने आणि कं पनीने तगादा लावल्याने तरुणाने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन घेतल्याची घटना भार्इंदरमध्ये घडली.

पेट्रोल ओतून तरूणाने भर रस्त्यात पेटवून घेतले
मीरा रोड: मित्राने आपल्या नावावर घेतलेल्या मोबाईल खरेदीच्या कर्जाचे हप्ते फेडत नसल्याने आणि कं पनीने तगादा लावल्याने तरुणाने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन घेतल्याची घटना भार्इंदरमध्ये घडली.
भार्इंदर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवचंदनगरमधील जैन भुवनमध्ये मयंक विनोदभाई शहा (२८) कुटुंबासह राहतात. त्यांचा मित्र चेतन याने बजाज फायनान्स कंपनीकडून मयांकच्या नावे हप्त्यावर मोबाईल घेतला. पण तो हप्ते भरत नसल्याने कंपनीकडून पैसे वसुलीसाठी मयांकला सातत्याने फोन येत होते. तगाद्याला कंटाळलेल्या मयंकने चेतनला वारंवार पैसे भरण्यास सांगितले होते. शनिवारच्या रात्रीही नाकोडा रुग्णालयासमोर रस्त्यावर मयांक व चेतनमध्ये यावरुन वाद झाला. त्यातून अखेर मयांकने पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
भर रस्त्यावर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. लोकांनी मयांकला आधी पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात नेले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने नंतर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या कमरेवरचा शरीराचा भाग जळाला असून तो ६० ते ६५ टक्के भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
भार्इंदर पोलिसांनी मयांकचा जबाब नोंदवला असून त्याने कोणाविरुध्द तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल केला नसून घटनेची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेने परिसरामध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. सुरूवातीला काय झाले याची उपस्थित असलेल्या नागरिकांना कल्पनाच आली नाही, असे काही जणांनी सांगितले.